‘त्या’ देशात दिवसाकाठी 5 ते 6 तासांची नोकरी! | पुढारी

‘त्या’ देशात दिवसाकाठी 5 ते 6 तासांची नोकरी!

तरावा : भारतात दिवसाकाठी सर्वसाधारण 8 तासांची नोकरी गृहीत धरली जाते. काही ठिकाणी कामाचे तास यापेक्षा कमी असतात, तर काही ठिकाणी अगदी 12 तासांपर्यंतचीही ड्युटी असते. कर्मचार्‍यांचे हक्क व कामाचे तास हा नेहमीच विभिन्न घटक ठरत आला आहे. प्रत्येक व्यवस्थापनावर या सर्व बाबी अवलंबून असतात. जगात असाही एक देश आहे, जिथे सरकार लोकांना आठवड्यातून जास्तीत जास्त 40 तास काम करायला लावते. याचाच अर्थ, प्रत्येक दिवशी अगदी 5 ते 7 तास काम केले तरी ते पुरेसे ठरू शकते. किरिबाटी असे या देशाचे नाव असून, सध्या तर तेथे 40 तासांपेक्षाही अधिक काम करवून घेतले जात आहे.

प्रशांत महासागराच्या मधोमध असलेला किरिबाटी हा 33 बेटांचा देश आहे. त्याची राजधानी तरावा असून, 800 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या देशात फक्त 20 बेटांवर लोक राहतात. समुद्रापासून दूर असलेल्या या देशाबद्दल फार काळ कोणालाच माहिती नव्हती. 19 व्या शतकात युरोपियन प्रवासी इथे आले आणि लवकरच इथे बि—टिशांचे राज्य झाले. यानंतर लोकांची वर्दळ वाढली. किरिबाटीमध्ये कोरल रीफ आहेत. हे कोरल रीफ 388 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेले आहेत. खोल आणि स्वच्छ समुद्रामुळे जगभरातून लोक इथे डायव्हिंगसाठी येतात.

किरिबाटी सरकारने एक विभाग तयार केला असून, लोकांनी ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त काम करू नये, हे तो विभाग पाहतो. एम्प्लॉयमेंट अँड इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2015 च्या एका कलमानुसार, कर्मचारी आठवड्याच्या पाच दिवसांत 40 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत. मात्र, हा केवळ सरकारी नियम आहे. प्रत्यक्षात कामाचे तास 5 ते 6 तासांवर आले आहेत. 2022 मध्ये इथल्या लोकांचे सरासरी कामाचे तास 28 तासांपेक्षा कमी होते, असे स्टॅटिस्टिकाने मान्य केले होते.

कामाचे तास इतके कमी का?

इथली बहुतांश कामे समुद्र किंवा त्याच्याशी संबंधित असल्याने कामाचे तास वाढतात व कमी होत राहतात. वादळी वारा असेल, तर लोक बाहेरची कामे करू शकत नाहीत. याचा परिणाम कामाच्या सरासरी तासांवरही होतो. जर कोणी पाच दिवस आणि आठ तासांपेक्षा थोडे जास्त काम करत असेल, तर त्याला ओव्हरटाईम किंवा अतिरिक्त रजा मिळावी, याचा निर्णय ईआयआरसी घेते. बराच काळ जगापासून अलिप्त राहिलेल्या या देशात अजूनही, थोडे काम व जास्त आराम अशी संस्कृती आहे.

Back to top button