बारामती मतदारसंघात कोण होणार ‘लेडी सिंघम’; सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? | पुढारी

बारामती मतदारसंघात कोण होणार ‘लेडी सिंघम’; सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे?

माणिक पवार

नसरापूर : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवले आहे. दोन्हींकडून ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगितले जात असून, अटीतटीच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे यांमधील कोण होणार बारामतीची ‘लेडी सिंघम’ खासदार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी (दि. 7) दोन्ही उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार असून, याबाबत मोठ-मोठ्या पैजादेखील लावल्या जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर काका-पुतण्यामध्ये राजकीय वैर निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे; मात्र, शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांवर पकड ठेवून राजकीय मैदानात तग धरला आहे. स्वतःकडे असलेली राजकीय फौज आणि अजित पवार यांच्यापासून वंचित असलेल्या मंडळींना घेऊन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उभा केला.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल अशी लढत झाली होती. त्या वेळी कुल यांचा दीड लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. पण, आताची परिस्थिती वेगळी असल्याने महायुती आणि महाआघाडीने एकमेकाविरुद्ध कंबर कसली आहे. बारामती मतदारसंघ मिळावा यासाठी महायुतीत रस्सीखेच नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास पहिल्यापासून निश्चितच होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदर उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराला वेग आला होता. त्यांच्यासोबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आहे. त्यामुळे त्या सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर देतील का? हे बघणे औत्सुक्याचे आहे.

मतदारसंघात बलाबल कोणाचे अधिक?

बारामती लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येत असून, एकूण आठ प्रमुख तालुके आणि हवेली तालुक्याचा काही भागांचा समावेश आहे. लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर-हवेली, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पक्षाच्या फुटीनंतर मताचे विभाजन जरी झाले असले, तरी सहापैकी दोन ठिकाणी भाजप आमदार, दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार, तसेच दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत.

हेही वाचा

Back to top button