नाशिक : चाळीस बँकांची निवडणूक जाहीर; 31 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्णत्वाचे आदेश | पुढारी

नाशिक : चाळीस बँकांची निवडणूक जाहीर; 31 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्णत्वाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे मुदत संपूनही निवडणूक होऊ न शकलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना प्रारंभ झाला आहे. यात बहुप्रतीक्षित नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था (एनडीएसटी), नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक, दि जनलक्ष्मी सहकारी बँक, गणेश सहकारी बँक, गोदावरी नागरी सहकारी बँक, दि राजलक्ष्मी नागरी सहकारी बँक, दि बिझनेस बँक, श्री समर्थ सहकारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजसेवक पतसंस्था यांसह 40 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे महिनाभरात या बँकांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल.

जिल्हा निवडणूक आराखड्यातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय संस्था वगळता इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, सर्व प्रशासक, प्रशासक मंडळ नियुक्त सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपलेल्या सहकारी संस्था आणि 2021 मधील 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीत निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था यांची निवडणूक प्रक्रिया 1 मे 2022 पासून सुरू करण्याबाबत तसेच या संस्थांच्या निवडणुका 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. या रणधुमाळीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

संबंधितांची स्वाक्षरी बंधनकारक
जिल्हा निवडणूक आराखड्यातील नाशिक तालुक्यातील अशा संस्थांनी प्रारूप मतदारयाद्या जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. या संस्थांनी प्रारूप मतदारयाद्या 1 एप्रिल 2022 या अर्हता दिनांकावर तयार करून, प्राप्त करून घेऊन प्रारूप मतदारयादी 13 एप्रिलपर्यंत निवडणूक निधीसह वरील कार्यालयाकडे सादर कराव्या लागणार आहेत. प्रारूप मतदारयाद्या सादर करताना आवश्यक प्रमाणपत्र नमूद करून त्यावर संबंधित संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सचिव किंवा व्यवस्थापक यांची स्वाक्षरी बंधनकारक आहे.

हेही वाचा:

Back to top button