Heat wave : प. बंगाल, ओडिशामध्ये उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून रेड अलर्ट | पुढारी

Heat wave : प. बंगाल, ओडिशामध्ये उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी उष्णतेच्या लाटेसंबंधी ‘रेड अलर्ट’ तर बिहार आणि झारखंडसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि पूर्व उत्तर प्रदेश तसेच केरळच्या उत्तर भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर तेलंगणामध्ये पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवला आहे. Heat wave
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उष्ण आणि दमट परिस्थितीमुळे बंगाल आणि ओडिशामध्ये दिवसाच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार “ओडिशात, विशेषत: उत्तर ओडिशातही उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना केला जात आहे. Heat wave
पश्चिम बंगालमधील पश्चिम वर्धमान जिल्ह्यात शनिवारी सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कोलकाता येथे दिवसाचे कमाल तापमान ४१.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर ओडिशातील अंगुलमध्ये ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि राजधानी भुवनेश्वर येथे ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या वर्षी प्रथमच तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील तीन दिवसांत दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Heat wave : राजधानीत उकाड्यापासून दिलासा

एकीकडे प. बंगाल, ओडिशामध्ये उष्णतेची लाट असली तरी राजधाना दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात शुक्रवारी झालेल्या पावसाने राजधानीतील तापमान शनिवारी ४०.५ अंश सेल्सिअसवरून ३८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. त्यामुळे  दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. तसेच दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेतही काहीशी सुधारणा झाली.
हेही वाचा 

Back to top button