नाशिक : लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही ; महसूल कर्मचार्‍यांचा पवित्रा | पुढारी

नाशिक : लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही ; महसूल कर्मचार्‍यांचा पवित्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने अनेकदा आश्वासने दिली. परंतु, अद्यापही त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे यंदा लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, असा पवित्रा महसूल कर्मचार्‍यांच्या संघटनेने घेतला आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, लेखा व कोषागार विभागाने सोमवारी (दि. 11) महसूल कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा दिला.

राज्यातील महसूल कर्मचारी शासनदरबारी प्रलंबित मागण्यांसाठी 4 एप्रिलपासून संप पुकारला आहे. संपादरम्यान, शनिवारी (दि. 9) नाशिक दौर्‍यावर आलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

तसेच संप मागे घ्यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी पदाधिकार्‍यांना केली. परंतु, गत अनुभव बघता कर्मचारी संपावर ठाम असून लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, असा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील व प्रांत कार्यालयांमध्ये सोमवारी (दि. 11) देखील कामकाज ठप्प झाले होते. कर्मचारी जागेवर नसल्याने कार्यालयांमध्ये कामे घेऊन आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.

‘जिल्हाधिकारी’त शुकशुकाट
महसूल कर्मचार्‍यांच्या संपात लिपिक, अव्वलकारकून, नायब तहसीलदार संवर्गातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांना टाळे लागलेले पाहायला मिळत आहे. त्यातच राज्याची अनुसूचित जाती कल्याण समिती नाशिकच्या दौर्‍यावर आहे. अधिकारी वर्ग या दौर्‍यात व्यग्र आहे. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पाहावयास मिळाला.

हेही वाचा :

Back to top button