

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात आजअखेर उपलब्ध उसापैकी 95 हजार हेक्टरमधील उसाचे गाळप झाले आहे. अजूनदेखील किमान 1600 ते 1700 हेक्टरमधील ऊस तोडीच्या प्रतीक्षेत उभा आहे. दरम्यान, गेल्या चार हंगामात प्रथमच जिल्ह्यात साखरेच्या उत्पादनाने एक कोटी क्विंटलचा टप्पा पार केला आहे. आता हुतात्मा, सोनहिरा, उदगिरी आणि निनाई – दालमिया हे कारखाने सुरू आहेत.
जिल्ह्यात अठरांपैकी सात कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. उर्वरित पैकी तीन ते चार कारखान्यांचे गाळप दोन दिवसांत बंद होत आहे. यावेळी 14 कारखान्यांनी हंगाम घेतला. यात आजअखेर 90 लाख 12 हजार 476 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. आजअखेर 1 कोटी 2 लाख 57 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात दत्त शुगर इंडिया सांगली कारखान्याने उच्चांकी नोंद केली आहे. या ठिकाणी 10 लाख 80 हजार 315 टन गाळप तर 11 लाख 80 हजार 900 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने 12.65 टक्के उतारा मिळवीत अग्रस्थान उतार्यात अग्रस्थान पटकावले आहे. दरम्यान, चालू गळित हंगाम साखर कारखाने, ऊसउत्पादक शेतकरी आणि तोडणी मजूर या सर्वच घटकांसाठी विलक्षण कसोटी पाहणारा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथमच ऊसउत्पादकाला तोडीसाठी कमालीची धावपळ करावी
लागली.
या हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख 22 हजार 340 हेक्टर क्षेत्रात उस उपलब्ध होता. मात्र आजअखेर यातील एक लाख 20 हजारहून अधिक हेक्टरमधील उसाचे गाळप झाले आहे. अद्यापही किमान 1600 हेक्टरमधील उसाचे गाळप बाकी आहे. मात्र वाढू लागलेला उन्हाचा तडाखा, कारखान्यांची अपुरी यंत्रणा आणि आता रोज सायंकाळी होणारा वादळी पावसाचा तडाका यामुळे ऊस तोडीची गती कमालीची मंदावली आहे. अनेक ठिकाणी तोडणी मजूर परत गेले आहे. पर्यायी यंत्रणेसाठी अनेक कारखान्यांना धावपळ करावी लागली आहे. तर शेतकरी तोडीसाठी चैत्रवणव्यात धावपळ करत आहे.
दुहेरी नोंदीचा फटका
जिल्ह्यातील किमान तीस टक्के शेतकरी आपल्या उसाची नोंद एकाहून अधिक कारखान्यांकडे करतात. यामुळे प्रत्यक्षात क्षेत्र कमी पण कागदावर ते तिप्पट दिसते. यातून उसाचे क्षेत्र विनाकारण जादा दिसते, नेमका याचा गैरफायदा ऊस जादा असल्याची आवई उठवित कारखानदार घेतात. यावेळी देखील शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील उपलब्धपैकी अद्यापही 1600 ते 1700 हेक्टरच्या घरातील ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत राहिला आहे. एकरी जरी 40 टनाचा उतारा धरला तरी अद्यापही किमान 95 ते 99 हजार लाख टन गाळपाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ऊसउत्पादकांची तोडीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक, लूट झाली आहे. तोडणी मजुरांनी अक्षरश: हजारो रुपये एका एका एकरासाठी उकळले आहेत. शासनाने ही रक्कम शेतकर्यांना परत मिळवून द्यावी. कारखान्याकडून होणारी ऊस तोडणीच्या रकमेची कपात करणे बंद करावे. एकाच कामासाठी दोनदा पैसे द्यावे लागत आहेत. हा अन्याय आहे. आम्ही याविरोधात साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे, कारखान्यांनी हे पैसे दिले नाहीत तर प्रसंगी संघर्ष करून वसुली करू.
– महेश खराडे
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना