नाशिक : ’नासाका’ बंद पडण्यामागची कारणे शोधावी ; पालकमंत्री भुजबळांचा सल्ला | पुढारी

नाशिक : ’नासाका’ बंद पडण्यामागची कारणे शोधावी ; पालकमंत्री भुजबळांचा सल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक सहकारी साखर कारखाना नऊ वर्षांनंतर सुरू होणार आहे. तो सुरू करताना हा कारखाना ज्यांनी चालवायला घेतला त्यांनी हा कारखाना का बंद पडला याची कारणे शोधावी. म्हणजे त्यांना कारखाना जास्तीत जास्त दिवस उत्तम चालवता येईल, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

शनिवारी ( दि. 2 ) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक सहकारी साखर कारखान्याचे गेट ना. भुजबळ यांच्या हस्ते उघडण्यात आले. या कार्यक्रमाकडे नाशिकसह सिन्नर, इगतपुरी, र्त्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते. व्यासपीठावर कोल्हापूर येथील युवराज छत्रपती शहाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे, आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर, दीपक चंदे, दत्ता गायकवाड, दशरथ पाटील, राजाभाऊ वाजे, बबन घोलप, निवृत्ती डावरे, निवृत्ती अरिंगळे, दिनकर आढाव, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी ना. भुजबळ म्हणाले की, मीदेखील कारखाना चालवायला घेतला होता. मला त्याचा चांगला अनुभव आहे. हे खूप अवघड काम असते. छत्रपती शहाजीराजे भोसले, दीपक चंदे यांनी कारखाना सुरू करताना सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा. आ. अहिरे म्हणाल्या की, शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील आनंद दिसतो आहे. माझ्या वचननाम्यात नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे वचन दिले होते. कुणाच्याही प्रयत्नाने असोत; पण ते पूर्ण होत आहे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास मी तयार आहे.

तानाजी गायधनी यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर गोडसे यांनी आभार मानले. छत्रपतींचे घराणे शेतकर्‍यांच्या पाठीशी : छत्रपती शहाजीराजे भोसले म्हणाले की, छत्रपतींचे घराणे कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. नासाका सुरू करताना काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करण्याचा शब्द खासदार गोडसे, दीपक चंदे यांनी दिला आहे. कारखाना बंद पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

विचार करून निर्णय घ्यावा :

आ. कोकाटे म्हणाले की, दीपक चंदे, खा. गोडसे यांनी कारखाना सुरू करताना मशीनरीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याची कॅपॅसिटी बघून जुना कारखाना सुरू करावा की नवीन याविषयी विचार करावा.

शेतकर्‍यांसाठी निर्णय घेतला : खा. गोडसे

खा. गोडसे यांनी सांगितले की, कारखाना सुरू करण्याचा मोठा निर्णय शेतक-यांसाठी घेतला आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश निश्चित मिळेल. इतर उत्पादनेदेखील सुरू केली जाणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button