‘यूपीए’ अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव समर्पक-हेमंत पाटील | पुढारी

‘यूपीए’ अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव समर्पक-हेमंत पाटील

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जोपर्यंत विरोधकांच्या एकजुटीला प्रभावी चेहरा मिळणार नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भाजपची विजयी घोडदौड रोखता येणं अशक्य आहे म्हणून यूपीएच्या सक्षम नेतृत्वासाठी त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव समर्पक असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, याप्रश्‍नी दिल्‍ली, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेससह छोट्या-मोठ्या प्रादेशिक पक्षांनी एकत्रित येऊन विरोधकांची आघाडी उभारली तर भाजपला रोखता येवू शकते. त्यामुळे पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवून विरोधकांच्या नेतृत्वाला एक प्रभावी धार मिळेल. पवारांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांना एकजुट करण्यासह त्यांचे मत जाणून घेण्यासाठी येत्या दि. 6 एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांची देखील ते भेट घेतील. यूपीएला जोपर्यंत प्रभावी नेतृत्व मिळणार नाही तोपर्यंत भाजपचा पराभव अशक्य आहे. शरद पवार यांचा 2024 चा अजेंडा ठरला आहे.विरोधकांची वज्रमूठ ते बांधू शकतात.त्यांच्या अनुभवाचा तसेच राजकीय प्रगल्भतेचा विरोधकांना फायदा झालेला आहे.

भाजप विरोधी 10 राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात येणार असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.गुजरात विधानसभा निवडणूक पुर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे पवारांना युपीएचे अध्यक्ष बनवले तर विरोधकांना प्रभावी नेतृत्व मिळेल. अरविंद केजरीवाल देखील पवारांच्या नावासंबंधी सकारात्मक आहे. पवारांच्या नेतृत्वासंबंधी इतर प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांसोबत त्यामुळे चर्चा करणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले.

Back to top button