कराड : कृष्णा कॅनॉलच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतूद | पुढारी

कराड : कृष्णा कॅनॉलच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतूद

कराड : अशोक मोहने
कराड पासून सुरू होणार्‍या आणि चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या कृष्णा कॅनॉलची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. रस्त्याचा भाग खचून कॅनॉलमध्ये कोसळला आहे. याबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्यानंतर महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने कृष्णा कॅनॉल दुरूस्तीसाठी टेंडर प्रसिध्द केले असून यासाठी पावने तीन कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून खचलेल्या ठिकाणी गॅबियन वॉल, साकव पूल व कॅनॉल रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

कृष्णा कॅनॉल कराड तालुक्यातील खोडशी येथून सुरू होतो. सातारा जिल्ह्यातील कराड तालुका व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील 13 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना कॅनॉलच्या पाण्याचा लाभ होतो. शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न या कॅनॉलमुळे सुटत आहे. मात्र ठिकठिकाणी कॅनॉलची पडझड झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याचा भाग कॅनॉलमध्ये कोसळला आहे. साकव पूल नाही अशी परिस्थिती होती. कॅनॉलची डागडुजी होणे गरजेचे होते. याबाबत शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. अखेर जलसंपदा विभागाने टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागांतर्गत यासाठी निधीची तरतूद केली आहे.

या निधीतून कृष्णा नदीच्या खोडशी बंधार्‍यालगत उर्ध्वगामी गॅबियन वॉल बांधण्यात येणार आहे. 40 मीटर लांबीची ही गॅबियन वॉल आहे. म्हणजे खोडशी ते सैदापूर, गोवारे हद्दीपर्यंत कॅनॉललगत भिंत बांधण्यात येईल. सैदापूर व गोवारे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला ही भिंत होईल. शिवाय वितरिकांची दुरस्ती करण्यात येणार आहे. रेठरे वितरिकेतील मालखेड फाटा उपवितरिकेची दुरूस्ती करण्यात येणार आहे. शिवाय कार्वे येथील बुलबुल मळा ते कोरेगाव रस्ता दरम्यान कॅनॉल व साकव पूल तर शेरे येथील कृष्णा कॅनॉलवर मारूती पानंद रस्त्यावर साकव पूल बांधण्यात येणार आहे. शिवाय गॅबियन वॉल बांधण्यात येणार आहे.

दरम्यान वाळवा तालुक्यातील हद्दीत ओढ्याच्या पाण्यामुळे खचून शेतजमिनीच्या व भविष्यात होणार्‍या कृष्णा कालव्याच्या भिंतीस धोका संभवत आहे अशा ठिकाणी गॅबियन भिंत बांधण्यात येणार आहे. शिरटे ता. वाळवा येथे शिरटे शीव ते येडे मच्छिंद्रपर्यंत कॅनॉलची दुरूस्ती करण्यात येणार आहे. शिरटे ते येडेमच्छिंद्र पर्यंत कॅनॉल रस्ता खडीकरण करणे, येडे एस्केप ते भवानीनगर चौकी सर्व्हिस रोड खडीकरण, मुरूमीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. कामाची ऑनलाईन निविदा मागविण्यात आली असून 18 एप्रिलपर्यंत निविदा कालावधी आहे. यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे पाटबंधारे कार्यालयातून सांगण्यात आले.

टेंडरची प्रक्रिया पंधरा-वीस दिवसात पूर्ण झाल्यानंतर कृष्णा कॅनॉल दुरूस्तीचे काम सुरू होईल. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी गतीने प्रवाहीत होण्यास मदत होईल. शेतकर्‍यांना याचा लाभ होईल.
– एस.एच.चव्हाण
प्र.उपविभागीय अधिकारी कृष्णा कालवा उपविभाग कराड.

Back to top button