जळगाव : ‘किसान एक्सप्रेस’ कायम करण्याची केळी उत्पादकांकडून मागणी | पुढारी

जळगाव : 'किसान एक्सप्रेस' कायम करण्याची केळी उत्पादकांकडून मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; वर्षभरापासून किसान एक्स्प्रेसने केळी वाहतूक सुरू केली आहे. केळी वाहतुकीलाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या किसान एक्स्प्रेसची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे किसान एक्स्प्रेस कायम सुरू ठेवावी, अशी केळी उत्पादकांकडून मागणी होत आहे.

कोरोना वैश्विक महामारीत सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले होते. या काळात शेतकऱ्यांना त्यांचा सोन्यासारखा शेतमाल अक्षरशः रस्त्यावर फेकावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. कोरोना काळात शेतकऱ्यांना आलेली मरगळ झटकण्यासाठी, भारत सरकार, राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वे विभागाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा शेतमाल इच्छितस्थळी पाठवून, त्या शेतमालाला योग्य भाव मिळावा त्यासाठी किसान एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती.

सावदा रेल्वे स्थानकावरून गेल्या वर्षभरापासून रेल्वेने केळीची वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. रावेर रेल्वे स्थानकावरून दर रविवार व बुधवार या दिवशी केळीची वाहतूक सुरू असते. दरम्यान गेल्या महिन्यातच मध्य रेल्वेच्या किसान एक्सप्रेस द्वारे 1000 फेऱ्या पूर्ण होऊन रेल्वेला यातून मोठे उत्पन्न मिळत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे केळीला प्रचंड मागणी आहे अशातच रेल्वे वाहतूक द्वारे केळी बंद झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक जळ सोसावी लागेल.

सध्या सावदा येथून वीपीएन व बीसीएन या दोन प्रकारच्या रेल्वे वॅगन ने केळीची वाहतूक सुरू आहे. सावदा -दिल्ली  व्ही. पी. एन वॅगन्स द्वारे 180 प्रति क्विंटल, बी. सी. एन. वॅगन्सद्वारे 160 प्रति क्विंटल या प्रमाणे रेल्वे कडून दर आकारले जातात. इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने सावदा ते दिल्ली ट्रक भाडे प्रति क्विंटल 580 रुपये  आहे. रेल्वे दरात व मालट्रक दरात मोठी तफावत आहे. त्यामुळे किसान एक्सप्रेस बंद झाल्यास केळी भावांवर परिणाम होईल. त्यासाठी किसान एक्सप्रेस पूर्ववत सुरू ठेवावी, असे कमलाकर पाटील, केळी उत्पादक शेतकरी कोचूर तालुका रावेर यांनी म्हटले आहे.

रेल्वेला वर्षभरात मोठा महसूल

सावदा रेल्वे स्थानकावरून 12 जानेवारी 2021 पासून ते फेब्रुवारी 2022 पर्यंत रेल्वेच्या एकूण 284 फेऱ्या पूर्ण झाल्या आहे. सावदा येथून तेरा महिन्याच्या कालखंडात 119626 टन केळी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यातून रेल्वेला 36 करोड़ 59 लाख रुपयाचा महसूल मिळाला आहे.

रेल्वे विभागाकडून हालचाली

रेल्वे विभागाकडून सावदा ते दिल्ली केळी वाहतूक नियमित सुरू राहावी, यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाल्यास नियमित केळी वाहतूक सुरू राहील असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

माल ट्रकही वेळेवर मिळेना

सावदा ट्रान्सपोर्ट हब म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. परप्रांतातील ड्रायव्हर आपल्या गाड्या भरण्यासाठी सावदा इथे खंडवा, इंदोर, भोपाल, नागपूर औरंगाबाद, पुणे, धुळे येथून गाड्या खाली करून येत असतात. परंतु त्याच भागात गाड्यांची मागणी वाढल्याने सावदा येथील ट्रान्सपोर्ट वर गाड्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे वेळेवर गाड्या मिळणेही केळी व्यापाऱ्यांना आता मुश्कील झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button