नाशिक : पाणी टंचाईचे माहेरघर असलेल्या मनमाडकरांवर आणखी नवे संकट

नाशिक : पाणी टंचाईचे माहेरघर असलेल्या मनमाडकरांवर आणखी नवे संकट
Published on
Updated on

नाशिक : (मनमाड, रईस शेख) :

चोरटे कधी काय चोरतील याचा नेम नाही. मनमाड मध्ये चोरट्यांनी आपला मोर्चा आता विद्यार्थ्यांच्या सायकली आणि घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या चोरण्याकडे वळविला आहे. मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत आहे. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहरातील नागरिकांना चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

राज्यात मनमाड शहर पाणी टंचाईचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या 35 वर्षापासून येथील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. आजही शहरात पालिकेतर्फे महिन्यातून दोन वेळा अर्थात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पालिकेतर्फे देण्यात येत असलेले पाणी पंधरा दिवस पुरावे यासाठी त्याची साठवणूक करण्याकरिता गोरगरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांच्या घरात आणि घराबाहेर 500 ते 1000 लिटर क्षमतेच्या टाक्या ठेवलेल्या आहे. आता या टाक्या चोरीला जात आहेत.

तर दुसरीकडे, काही वर्षांपूर्वी शाळा शहराच्या मध्यभागी होत्या. मात्र कालांतराने लोकसंख्या वाढत गेली त्यामुळे शाळांची संख्या देखील वाढून अनेक शाळा शहराच्या बाहेर सुरू झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मनमाड, नांदगाव यासह इतर गावातील शाळेत येतात मात्र दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी सायकल वापरण्यास सुरुवात केली आहे. शाळेत आल्यावर विद्यार्थी त्यांच्या सायकली शाळेच्या आवारात लावतात. काही शाळांमध्ये व्यवस्था नसल्याने मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी सायकली उभ्या करतात. शिवाय शाळेतून परतल्यानंतर घराच्या बाहेर सायकली लावल्या जातात. विशेष म्हणजे या सायकलींना कुलूप लावलेले असते. मात्र चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा या सायकलींकडे व पाण्याच्या टाक्यांकडे वळविला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

त्यात इथे मोटारसायकल चोरी गेल्यानंतर तक्रार देऊन देखील तपास लवकर लागत नाही, मग सायकल आणि पाण्याच्या टाकीचं काय घेऊन बसलात? असा विचार करत नागरिक चोरीची तक्रारही देत ऩाहीत. त्यातल्या त्यात कुणी तक्रार देण्यासाठी गेल्यास पोलिस पाण्याची टाकी विकत घेतल्याची पावती घेऊन यायला सांगतात. अनेकजण पावती सांभाळून ठेवत नाही, त्यामुळे तक्रार नोंदवता येत नाही, याचाच फायदा चोरटे घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सायकल आणि पाण्याच्या टाकीची चोरी करणारी टोळी असल्याचे बोलले जात असून चोरलेल्या सायकली आणि पाण्याच्या टाक्या मालेगाव, धुळे येथे तर सायकली येवला कोपरगाव येथे विकल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news