फडणवीसांनी धुळ्यातील रस्त्यांचा निधी अडवला : अनिल गोटे यांचे शरसंधान | पुढारी

फडणवीसांनी धुळ्यातील रस्त्यांचा निधी अडवला : अनिल गोटे यांचे शरसंधान

धुळे पुढारी वृत्तसेवा : ईडी कडे केलेल्या तक्रारींचे आरोप प्रत्यारोप गाजत असतांनाच माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नव्याने शरसंधान केले आहे.

विकासाच्या कामांना विरोध नसल्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे, असे ते म्हणतात. मग धुळे शहरातील पांजरा नदीलगतच्या रस्त्यासाठी मंजूर केलेले 25 कोटी रुपये का थांबवले, असा प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. या कामाचे टेंडर साडेबारा टक्के बीलो असून त्यावर साडेबारा टक्के जीएसटी लागल्याने ठेकेदारांना साडे 24 टक्के याचा फटका बसला आहे. हे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. मात्र आता राज्याचे मंत्री अजित पवार यांनी दहा कोटी रुपये मंजूर केल्याने हे काम मार्गी लागणार आहे. या रस्त्या कामाचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखला असून त्यांनी त्यांच्या विकास कामांना असणारा विरोध दर्शवला असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केला.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीने केलेल्या कारवाईनंतर धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मिरची हा भागीदार असलेल्या संस्थेकडून 20 कोटी रुपये घेतल्याची तक्रार ईडी कडे केली. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना गोटे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या आरोपांचा संदर्भात खुलासा करण्याची प्रतिक्रिया दिली. यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा टीकेची तोफ डागली आहे.

आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुंबईच्या पत्रकार परिषदेत भूमिका त्याच वेळेस मांडली होती. त्यावेळी बोलताना कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असेच म्हटले होते. कदाचित हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आले नसावे. त्यामुळे त्यांनी आता ही भूमिका जाणून घ्यावी, असा टोला गोटे यांनी लावला आहे. मी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या संदर्भात केलेली टीका सभागृहाच्या पटलावर आहे, मात्र अर्ध्या रात्री उठून त्यावेळी मी राष्ट्रवादीशी घरोबा केला नाही. तुम्ही मध्यरात्री उठून मंत्री अजित दादांच्या घरी का गेले, तसेच पहाटे शपथविधी कसा घेतला याची तुम्हाला आठवण नाही, असा टोला देखील गोटे यांनी लगावला.

अवास्तव चर्चा न करता त्याच विषयावर बोलण्याचा सल्ला देखील गोटे यांनी दिला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनिल गोटे या नावाला विरोध होता. मात्र त्यांनी हा राग धुळे शहरातील नदीलगतच्या रस्त्यांवर काढला. या रस्त्यांसाठी निधी मंजूर असून देखील त्यांनी 25 कोटी रुपये देणे टाळले. त्यामुळे या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. पण आता मंत्री अजित पवार यांनी दहा कोटी रुपये मंजूर केल्यामुळे या रस्त्याचे काम होणार आहे. भारतीय जनता पार्टी विकासाला विरोध करत नाही असे सांगणाऱ्या फडणवीस यांनी धुळे शहराच्या विकासाला मोगरी लावण्याचे कारण काय असा प्रश्न देखील अनिल गोटे यांनी केला आहे.

आपण ईडी कडे केलेली तक्रार वस्तुस्थितीवर आधारित असल्यामुळे त्याची दखल त्यांना घ्यावीच लागणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या एका गैरप्रकार प्रकरणात आरोपीने केलेल्या अर्जावर त्यांनी तपास एजन्सी बदलण्याची सूचना केली आहे. आरोपीच्या मागणीवरून तपास यंत्रणा बदलता येते का, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. सत्य लोकांपुढे मांडण्याचे आपले काम आहे. मात्र राज्याचे राजकारण रसातळाला गेले आहे. काही लोक दररोज ईडीकडे तक्रारी स्वरूपात जातात. ईडीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते भेळचे दुकान नाही, असा टोला देखील त्यांनी लावला आहे. आपण भारतीय जनता पार्टी मधून बाहेर निघताना दिलेल्या पत्रामध्ये केवळ तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नाराजी असलेले कारण देऊन पक्ष सोडला आहे असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा :

Back to top button