नाशिक : जि. प. नवीन इमारतीसाठी वळवणार पूर्ण सेस ; आजच्या सभेत प्रशासनाकडून प्रस्ताव | पुढारी

नाशिक : जि. प. नवीन इमारतीसाठी वळवणार पूर्ण सेस ; आजच्या सभेत प्रशासनाकडून प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.28) दुपारी सव्वाबाराला ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उपाध्यक्ष व अर्थ समिती सभापती डॉ. सयाजी गायकवाड अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी सेसमधून 12 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेवर चर्चेसाठी येणार आहे. सभेची त्यासाठी मान्यता घेतली जाणार आहे.

यावर्षी 20 मार्चला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार आहे. यामुळे प्रशासनाने फेब—ुवारीस अखेरीसच अंदाजपत्रकीय सभा घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी अंदाजपत्रकीय सभा जाहीर केली असली तरी सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीची भावना आहे. वित्त विभागाने अंदाजपत्रक छापून ते सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सदस्यांच्या पत्त्यांवर पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.

सर्वसाधारण सभेत मांडल्या जाणार्‍या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी नव्याने येणार्‍या सदस्यांच्या काळात होणार असल्यामुळे यावेळी प्रशासनाने सामान्य प्रशासन विभागासाठी मोठी तरतूद केल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात आधीच मोठी घट झाली आहे. त्यात ग्रामपंचायत, शिक्षण आदी विभागांकडून उपकर वसुलीबाबत काहीही पुढाकार घेतला जात नाही. यामुळे अंदाजपत्रक केवळ 27 कोटी रुपयांपर्यंतच थांबले आहे. अशा परिस्थितीत विकासकामांना निधी नसताना सेसमधून कर्मचारी, अधिकार्‍यांना लॅपटॉप, टॅब खरेदीचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे.

नव्या इमारतीचा खर्च वाढला
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने अधिकाधिक 25 कोटी रुपये देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, नवीन अंदाजपत्रकानुसार या इमारतीच्या खर्चात वाढ होऊन तो 37 कोटी रुपये झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सेसमधून 12 कोटी रुपये इमारतीसाठी द्यावे लागणार आहेत. जिल्हा परिषदेचे उत्पन्न घटत असल्यामुळे 2024 पर्यंत एवढा मोठा निधी कसा देणार याचा मोठा पेच जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे. मागील वर्षातील सेसचे जवळपास आठ कोटी रुपये शिल्लक तो पूर्ण सेस नव्या इमारतीसाठी देण्यात यावी, असाही एक मतप्रवाह असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

Back to top button