कीव्ह / मास्को : पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेन युद्धाचा ( Russia vs Ukraine) जोर वाढल्याने संपूर्ण जगावर चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी पुढील २४ तास युक्रेनसाठी अत्यंत कठीण असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, जी-७ च्या नेत्यांनी युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी युक्रेनला समर्थन जाहीर केले. रशियाच्या हल्यात आतापर्यंत ३५२ नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये १४ मुलांचा समावेश आहे.
बेलारुसने रशियाला समर्थन दिले आहे. युक्रेनविरोधात लढा देण्यासाठी सैनिक पाठवणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यांनी म्हटलं आहे. आजपासून बेलारुस सैनिकाच्या तुकड्या युक्रेनकडे रवाना होतील. या घडामोडींची संयुक्त राष्ट्र महासभेने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलवली असून अध्यक्षस्थानी संुयक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद असतील. संयुक्त राष्ट्र महासभेच्या इतिहासातील अशा प्रकारची ११ वी आपत्तकालीन बैठक असणार आहे.
युक्रेनने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने युद्धाचा भडका आणखी मोठा होताना दिसत आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशी रशियाने अधिक आक्रमक होत युक्रेनची आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. युक्रेन सोमवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मागील चार दिवस रशियाकडून होणार्या हल्ल्यात ३५२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ मुलांचा समावेश आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशी रशियाने कीव्हवर कब्जा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आज सकाळी कीव्ह आणि खार्किव्ह येथे आणखी दोन भीषण स्फोट झाले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या २४९ भारतीय विद्यार्थी हवाई मार्ग आज मायदेशी परतले. सकाळी दिल्ली विमानतळावर साडेसहा वाजता हे विद्यार्थी आले. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेले ११०० हून अधिक विद्यार्थी भारतात परतले आहेत.
हेही वाचलं का?