नाशिक : शाळेत आता कचर्‍याचे डबे सुशोभीकरण स्पर्धा, घनकचरा व्यवस्थापनाचे संस्कार रुजवणार | पुढारी

नाशिक : शाळेत आता कचर्‍याचे डबे सुशोभीकरण स्पर्धा, घनकचरा व्यवस्थापनाचे संस्कार रुजवणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत ओला कचरा व सुका कचर्‍याबाबतचे संस्कार रुजवण्यासाठी शालेय स्तरावर ओला कचरा व सुका कचरा टाकण्याचे डबे रंगवण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यावर भर देण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागात कचर्‍याचे विलगीकरण, ओल्या कचर्‍यापासून सार्वजनिक बायोगॅस प्रकल्प उभारणे, सुक्या कचर्‍याचे विघटन करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती करणे, स्थिरीकरण तळे उभारणे आदी प्रकल्प गरजेनुसार उभारण्यात येणार आहे. या वर्षी स्वच्छ भारत टप्पा दोनमधून जवळपास 500 गावांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. या योजनेच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने ओला कचरा व सुका कचर्‍याचे विलगीकरण करण्याबाबत प्रत्येक घरात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत ओला कचरा व सुका कचरा डबे सुशोभीकरण स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये ओला कचरा व सुका कचरा विलगीकरणाबाबत जागृती निर्माण होऊन घनकचरा व्यवस्थापनास त्याचा फायदा होऊ शकणार आहे.

अशी होणार स्पर्धा
या स्पर्धेनुसार विद्यार्थ्यांनी घरून दोन डबे घेऊन यायचे आहे. हे दोन डबे रंगवण्यासाठी शाळेतून त्यांना रंग, ब्रश पुरवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी कल्पना लढवून या दोन्ही डब्यांचे रंगकाम करायचे आहे. त्यावर पर्यावरणाचा संदेश देणारे चित्र काढायचे आहे. सर्वोत्तम डबे रंगवलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांनी डबे घरी न्यायचे व रोज आपल्या घरातील ओला व सुका कचरा विलगीकरण करून तो वेगवेगळ्या डब्यांमध्ये टाकायचा आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी व पालक या दोघांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत जागृती निर्माण होऊन ग्रामपंचायतीला त्या पद्धतीने कचरा उपलब्ध होईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Back to top button