नाशिक : माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्या मालमत्तेच्या चाव्या नदीपात्रात?

नाशिक : माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्या मालमत्तेच्या चाव्या नदीपात्रात?
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांचा खून केल्यानंतर संशयित आरोपी राहुल जगताप याने कापडणीस कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या चाव्या नदीपात्रात फेकल्याचा संशय आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसांनी शनिवारी (दि.19) मलजल निस्सारण केंद्राजवळील नदीपात्रात चाव्यांचा शोध घेतला, मात्र तेथे चाव्या आढळून आल्या नाहीत. त्याचप्रमाणे राहुलच्या आणखी एका फ्लॅटची पोलिसांनी पाहणी केली.

मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने संशयित राहुल जगताप याने नानासाहेब व डॉ. अमित कापडणीस यांचा डिसेंबर 2021 मध्ये कट रचून खून केल्याचे उघडकीस आले. राहुल ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत नानासाहेब यांच्या पत्नी शिक्षिका होत्या. त्या ओळखीचा संदर्भ देत राहुलने कापडणीस कुटुंबीयांसोबत संबंध वाढवल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुलची पोलिस कोठडी घेतल्यानंतर तपासास सुरुवात केली. राहुलने नानासाहेब यांच्याकडील रो-हाऊस, फ्लॅट व इतर मालमत्तांच्या चाव्या नदीपात्रात फेकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी मलजल निस्सारण केंद्राजवळील नदीपात्रात पाहणी केली, मात्र त्यांना काही आढळून आले नाही.

तपासाची दिशा भरकटवण्यासाठी राहुल चुकीची माहिती देत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नानासाहेब यांचे शेअर्स विक्री करून राहुलने त्याच्या भावाच्या नावे महागडी रेंजरोव्हर कार विकत घेतली, नानासाहेब यांच्या मालमत्तेची सर्व कामे नियमित ठेवली व काही पैशांमधून मौजमजा केल्याचे उघड झाले. पोलिसांनी राहुलकडून गुन्ह्यात वापरलेली कार व विकत घेतलेली कार, नानासाहेब यांच्या नावाचे धनादेश पुस्तक, महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

त्याचप्रमाणे नानासाहेब यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना दरीतील दोन झाडांमध्ये मृतदेह अडकला होता. त्यावेळी राहुलने मोठा दगड उचलून खाली फेकला होता. हा दगडही पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचप्रमाणे राहुलने एक लॅपटॉप फॉरमॅट मारण्यासाठी दुकानात दिला होता. तो लॅपटॉप जप्त केला असून, त्याच्यातूनही काही धागेदोरे मिळतात का याचीही पाहणी पोलिस करत आहेत. राजूर व मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेले मृतदेह नानासाहेब व डॉ. अमित यांचे असल्याचे निष्पन्न करण्यासाठी पोलिस डीएनए चाचणी करणार असल्याचे समजते.

पुराव्यांची, घटनाक्रमांची सांगड घालण्याचे प्रयत्न : कापडणीस पितापुत्र बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक यतिन पाटील यांच्यासह पोलिस शिपाई विशाल पवार व युवराज भोये यांनी तपास सुरू केला. बेपत्ता असतानाही नानासाहेब यांचे शेअर्स विक्री व इतर आर्थिक व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करून राहुलला अटक केली. त्यानंतर पोलिस आता या गुन्ह्यातील पुरावे व घटनाक्रमांची साखळी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चौकशी सुरू होताच राहुल सतर्क?

सुरुवातीस दोघांचे खून करून शेअर्स विक्री करून राहुलने मौजमजा केली. मात्र, दुसरीकडे कापडणीस पितापुत्रांच्या बेपत्ताची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात राहुलकडून झालेले आर्थिक व्यवहार पोलिसांनी पकडल्यानंतर राहुल सतर्क झाल्याचा अंदाज आहे. आपला गुन्हा पकडला जाऊ शकतो या भीतीपोटी त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे तो तपासाची दिशा भरकटावी यासाठी खोटी माहितीही देत असल्याचा संशय आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news