नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली असून, पक्षातर्फे यंदा 100 प्लसचा नारा देण्यात आला आहे. भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी केले आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्वच्या सर्व 44 प्रभागांमधील 133 जागांवर निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी स्वतःची माहिती असलेला अर्ज भरून द्यायचा आहे. पक्षाचे कार्यालय असलेल्या वसंतस्मृतीमध्ये हे अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालवे यांनी दिली आहे.
इच्छुकांनी अर्ज भरून हे त्या-त्या भागातील मंडल अध्यक्ष किंवा पक्षाच्या कार्यालयात जमा करायचे आहेत.
दरम्यान, शहरातील विद्यमान नगरसेवकांसह इतर अनेकांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. अशा सर्वच इच्छुकांनी त्यांचे अर्ज पक्षाकडे भरून द्यावे, असे आवाहन पालवे यांनी केले आहे.
तयारीचा भाग म्हणून प्रक्रिया सुरू
भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची पूर्ण माहिती असलेला अर्ज भरून घेण्याची पद्धत आहे. त्यानंतर पक्ष सर्व्हे, उमेदवार सर्व्हे, सामाजिक समीकरण, इच्छुकांच्या मुलाखती अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा राबविली जाते. त्यानुसार तयारीचा भाग म्हणून सर्वप्रथम इच्छुकांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे पालवे यांनी सांगितले.