बीएएमएस डॉक्टरांना भोंदू संबोधने महागात पडणार, आयुष मंत्रालयाचे परिपत्रक जारी | पुढारी

बीएएमएस डॉक्टरांना भोंदू संबोधने महागात पडणार, आयुष मंत्रालयाचे परिपत्रक जारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना बोगस अथवा भोंदू संबोधने आता महागात पडणार आहे. माध्यमांमध्ये अथवा सोशल मीडियावर या डॉक्टरांना भाेंदू अथवा बोगस डॉक्टर म्हटले गेल्यास नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक कायद्याचा तो भंग असणार आहे, असे आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वैद्यकीय विकास मंच व अस्तित्व परिषद या संघटनांना कळवले आहे.

आपल्याकडे पूर्वीपासून केवळ एमबीबीएस डॉक्टरांनाच सरकारी यंत्रणेने महत्व दिले. यामुळे सरकारी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊनही आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांच्या वाट्याला कायम उपेक्षा आली. या डॉक्टरांना कधीही सरकारच्या आरोग्य विभागात स्थान मिळाले नाहीच, उलट ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडून माध्यमांमध्ये या डॉक्टरांना भोंदू अथवा बोगस म्हणून हिणवले जाते. मात्र, केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यापासून ॲलोपॅथीप्रमाणेच या सुद्धा प्रमाणिक वैद्यकीय शाखा असल्याचे जाहीर केले असून त्यांच्यातील भेदभाव नष्ट केला आहे. मात्र, अद्यापही सामाजिक स्तरावरील भेदभावाची मानसिकता बदलेली नाही. यामुळे आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांसंबंधी माध्यमांमध्ये सर्रास टीकाटिप्पणी केली जाते. त्यांना बोगस वा भाेंदू म्हणून हिणवले जाते.

समाजमाध्यमांमध्येही याच पद्धतीेन उल्लेख केला जातो. बऱ्याचद कोणाच्या तक्रारीवरून पोलीसही भोंदू डॉक्टर म्हणून तक्रार लिहून घेतात. या बाबत आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आयुष मंत्रालयाकडे हा भेदभाव संपवण्याबाबत साकडे घातले होते. आयुष मंत्रालयाने १७ फेब्रुवारीस यासंंबधी परिपत्रक प्रसिद्ध केले असून आयुर्वेद व युनानी डाॅक्टर हे मान्यताप्राप्त असून माध्यमे, समााज माध्यमे, सरकारी परिपत्रके, पोलिसांच्या तक्रार पुस्तिका आदी ठिकाणी त्यांचा बोगस अथवा भोंदू म्हणून उल्लेख करणे हा नोंदणीकृत व्यावसायिक कायद्याचा भंग असल्याचे स्पष्टपणे कळवले आहे.

तसेच असा उ्ल्लेख करणे, या डॉक्टरांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन मानले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत वैद्यकीय विकास मंचचे समन्वयक डॉ. आशुतोष गुप्ता व अस्तित्व परिषदेचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना आयुषने पत्र लिहून कळवले आहे. यापुढे आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना बोगस अथवा भोेंदू म्हणून उल्लेख करणे महागात पडणार असल्याच इशारा डॉ. संदीप कोतवाल यांनी दिला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button