नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शाळेच्या मैदानावर विद्यार्थी जमा होत होते. तेवढ्यात सायकलला भव्य भगवा झेंडा लावून एक विद्यार्थी आत आला. त्याला बघताच शिक्षकांची धावपळ उडाली. त्या मुलाला तातडीने सायकल बाहेर काढण्यास सांगण्यात आले. एका शिक्षकाने घाईघाईने मुलाजवळ जाऊन झेंडा काढून घेऊन मग सायकल शाळेत आणण्यास सांगितले. त्या विद्यार्थ्यानेही झेंडा काढून घेतला आणि सायकल आत आणली. कर्नाटक राज्यात सध्या हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 'वेळीच एक टाका घातला, तर पुढचे फाटण्याचे टळते,' या उक्तीनुसार शिक्षकांनी दाखवलेले प्रसंगावधान कौतुकाचा विषय ठरले आहे.
नाशिकमधील एका प्रतिष्ठित शाळेत सकाळी 11.30 ला विद्यार्थी शाळेत येत होते. तेवढ्यात एक विद्यार्थी सायकलसह आत आला. सायकलला भलामोठा झेंडा लावलेला होता. क्रीडाशिक्षकाने तातडीने शिट्टी वाजवत व त्याला सायकल गेटबाहेर नेण्यास सांगितले. तो मुलगा भांबावून गेला. त्याने सायकल गेटबाहेर नेल्यानंतर संंबंधित शिक्षकाने त्याच्याजवळ जाऊन झेंडा लावलेली सायकल आतमध्ये आणू नकोस. सायकल बाहेर लावलेली असेल व तू वर्गात असशील. एखाद्याने झेंडा फाडला, तर त्याचा अपमान होईल. यामुळे हा झेंडा काढून दप्तरात ठेव. परत घरी जाताना झेंडा लावून जा, असे सांगितले. ही बाब मुलालाही पटल्याने त्याने झेंडा काढून घेतला व सायकल स्टॅण्डमध्ये सायकल उभी केली. केवळ दोन मिनिटांच्या या साध्या प्रसंगातून शिक्षण या मूल्याविषयी शिक्षकांच्या मनात रुजलेली भावना यातून दिसून आल्याची चर्चा होती.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.