आतापर्यंत हजारभर पुणेकर अडकले ‘जॉब ट्रॅप’मध्ये!

Jobtrap
Jobtrap

अशोक मोराळे

पुणे : नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षभरात 1 हजार 31 पुणेकरांना जाळ्यात खेचून 86 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. फसणार्‍यांमध्ये उच्चशिक्षित नागरिकांचा देखील लक्षणीय सहभाग आहे.

महिन्याला ८५ जण अडकतात जाळ्यात

महिन्याकाठी तब्बल 85 पुणेकर सायबर चोरट्यांच्या जॉब फ्रॉड ट्रॅपमध्ये अडकल्याचे वास्तव आहे. नामांकित कंपनीत प्लेसमेंट करून देतो, परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावतो, सरकारी खात्यात नोकरी लावतो, असे प्रलोभन दाखवून तरुण व तरुणींना जाळ्यात ओढले जात आहे.

पुण्याला शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दर्जेदार व सर्व प्रकारचे शिक्षण मिळण्याची सोय आहे. राज्यातील विविध शहरांबरोबरच परराज्य व विदेशातून शिक्षणासाठी येणार्‍या तरुण व तरुणींचे प्रमाण मोठे आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेकांना पुण्याबरोबरच औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात नोकरीची संधी उपलब्ध होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना संकटात अनेकांच्या हातचा रोजगार गेला. आयटी क्षेत्रापासून ते छोट्या-मोठ्या उद्योगात नोकरी करणार्‍या अनेकांना याची झळ बसली. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना नोकरीचा शोध नागरिकांनी सुरू केला. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी तरुण-तरुणींना जाळ्यात खेचण्याचा सपाटा लावला आहे.

असे खेचतात जाळ्यात..

सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना हेरून सायबर चोरटे आपल्या जाळ्यात खेचताना दिसत आहेत. बेरोजगार तरुण नोकरीसाठी विविध नोकरीविषयक संकेतस्थळावर नोंदणी करतात. पुढे हेच सायबर चोरटे ऑनलाइन नोंदणी केलेल्या तरुणांचे संकेतस्थळावरील मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क करतात. त्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवतात. एकदा का सावज जाळ्यात अडकले की चांगला पगार, परदेशात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळून गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत.

नोकरी लावणारी संस्था अधिकृत आहे का? आपल्या शैक्षणिक पात्रतेलाही नोकरी मिळू शकते का, हे पडताळावे. नोकरीच्या फसव्या जाहिरातीपासून दूर राहिले पाहिजे. शिक्षणापेक्षा जास्त चांगली नोकरी देण्याचे कोणी आमिष दाखवत असेल, तर त्यामध्ये फसवणुकीची शक्यता अधिक असते. प्रलोभनाला बळी न पडता नागरिकांनी प्रथम खात्री करावी.

                                                      -डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर

अशी टाळू शकता फसवणूक

  • विश्वसनीय व खात्रीशीर वेबसाइटवरच नोकरीसाठी नोंदणी करा
  • आपल्या शिक्षणापेक्षा मोठी नोकरी मिळत असेल, तर निश्चित फसवणूक, हे सूत्र लक्षात ठेवा
  • अनोळखी व्यक्तींच्या हवाली मुख्य शैक्षणिक कागदपत्रे देऊ नका
  • अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नका
  • अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news