

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ येताच पुन्हा एकदा आयारामांनी उचल खाल्ली आहे. या वेळी राष्ट्रवादीकडे आयारामांचा ओढा जास्त असल्याचे दिसत आहे.
कोणी विकासाचा सूर आळवत तर कोणी अन्याय झाल्याचे सांगत आपापल्या पक्षाला मूठमाती देत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे निष्ठेने एकाच पक्षाचे काम करणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 च्या निवडणुकीत भाजपने आयाराम गयारामांच्या बळावर महापालिकेत सत्ता खेचून आणली. 128 पैकी 77 जागा जिंकून भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले.
राष्ट्रवादीला 36, शिवसेनेला 9 तर मनसेला एका जागेवर विजय मिळाला. अपक्ष पाच ठिकाणी विजयी झाले.मागील निवडणुकीत आयरामांची पसंती भाजपला होती.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नितीन काळजे, माई ढोरे, संतोष लोंढे, अॅड. नितीन लांडगे, राजेंद्र गावडे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संतोष बारणे यांच्या पत्नी माया बारणे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे यांनी भाजपत प्रवेश केला व विजयही मिळवला.
शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सीमा सावळे व आशा शेंडगे तसेच सेनेच्या नगरसेविका संगीता भोंडवे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवून ती जिंकली.
शिवसेनेचे संदीप वाघेरे, तुषार हिंगे यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली व जिंकली. मनसेचे राहुल जाधव यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवली व जिंकली. तर, काँग्रेसचे राहुल भोसले, विनोद नढे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकली.
मागील निवडणुकीत 119 जागांवर उमेदवार उभे केलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या शुभांगी बोराडे, उर्मिला काळभोर, दत्तात्रय वाघेरे, विजय कापसे, सुरेखा लांडगे, स्वराज अभियानचे मारुती भापकर यांना उमेदवारी दिली.
मात्र, हे सर्व आयाराम गयाराम पराभूत झाले. शिवसेनेचे तत्कालीन उपशहरप्रमुख शाम लांडे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला व ते विजयी झाले.
आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आयाराम गयाराम चक्र सुरू झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला.
त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांची पक्ष विरोधी काम केल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.या वेळी आयारामांचा ओढा राष्ट्रवादीकडे असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे तसेच चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे, महापालिकेतील अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे पुन्हा स्वगृही परतले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू आहे.
तत्त्वांना तिलांजली देत विकासाची कारणे अन्यायाची ढाल पुढे केली जात आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत मतदार या भूलभुलैय्याला फसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले पिंपरी गावातील संदीप वाघेरे, तसेच भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराज असलेले भोसरीतील रवी लांडगे, चिखलीतील संजय नेवाळे हेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.