नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 10 मध्ये इच्छुकांसमोर भाजपचे तगडे आव्हान | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 10 मध्ये इच्छुकांसमोर भाजपचे तगडे आव्हान

नाशिक : गौरव अहिरे : मागील काही पंचवार्षिक निवडणुकींचा इतिहास पाहता प्रभाग 10 मधील मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांना सर्वाधिक कौल दिला असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना काही प्रमाणात संधी दिली आहे. भाजपकडील उमेदवारास आपसूकच पक्षाची ताकद मिळत असल्याने त्याचा विजय काहीसा सुकर होतो. मात्र, विरोधी उमेदवारांना त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे, विचारसरणीसह स्वत:च्या छबीची मतदारांवर छाप पाडण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. ही गोष्ट जमल्यास विरोधी इच्छुकांनाही विजयाची गवसणी घालणे सोपे जाईल, असे काहीसे चित्र प्रभाग 10 मध्ये दिसत आहे. मात्र, प्रभागात इतर पक्षांची ताकद मर्यादित स्वरूपात पाहावयास मिळत असल्याने भाजपच्या ताकदीसमोर इच्छुकांना त्यांची वैयक्तिक व पक्षाची ताकद आजमावी लागणार आहे.

नव्या प्रभाग रचनेनुसार शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपची ताकद सर्वाधिक पाहावयास मिळते. या प्रभागात उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सधन मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. प्रभागात सुरुवातीपासून प्रशस्त रस्ते, डांबरीकरण, पेव्हरब्लॉक, मैदाने, समाजमंदिरे, भुयारी गटार योजना आदी महत्त्वाची विकासकामे झाल्याने तेथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विद्यमान नगरसेवक व इच्छुकांना या विकासकामांसह इतर विकासकामे, प्रकल्पांची आश्वासने द्यावी लागत असतात. प्रभाग 10 मध्ये भाजपच्या उमेदवारांसमोर विरोधी पक्षांना सक्षम उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत प्रभाग 11 मध्ये आरक्षण सोडतीनंतर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक संतोष गायकवाड हे प्रभाग 10 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने ते मतदारांवर कसा प्रभाव पाडतील याकडेही लक्ष लागून राहणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचे विद्यमान नगरसेवक योगेश हिरे, हिमगौरी आहेर-आडके, स्वाती भामरे हेदेखील त्यांच्या एकगठ्ठा मतदारांची बांधणी करीत विजय सोपा कसा होईल याची आखणी करताना दिसत आहे.

असा आहे प्रभाग
बजरंगनगर, सावरकरनगर, शंकरनगर, नरसिंहनगर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल परिसर, दादोजी कोंडदेवनगर, सौभाग्यनगर, सुयोजित गार्डन परिसर, श्रमिक कॉलनी, एस. टी. कॉलनी, थत्तेनगर, डिसूजा कॉलनी, पंपिंग स्टेशन, विद्याविकास सर्कल, जेहान सर्कल, बिग बाजार चौकातील कविता कॉम्प्लेक्स.

प्रमुख इच्छुक उमेदवार
योगेश हिरे, हिमगौरी आहेर-आडके, स्वाती भामरे, संतोष गायकवाड, विक्रांत मते, किशोर शिरसाठ, देवदत्त जोशी, रमेश जाधव, श्रद्धा दुसाने, संगीता देसाई, संतोष कोरडे, पवन भगूरकर, पंकज जाधव, मनोहर कडलग.

या आहेत समस्या
प्रभागात लहान मुलामुलींसह युवकांना खेळण्यास प्रशस्त मैदानांचा अभाव दिसत आहे. काही उद्याने बंद किंवा नादुरुस्त आहेत. तेथे प्रेमीयुगुलांचा वावर जास्त दिसतो. भाजीबाजारामुळे होणारी अस्वच्छता. मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता. प्रभागात शिक्षण संस्था, मोठे मॉल, बाजारअसल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, वाहनांच्या तुलनेने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी वाढली आहे.

नागरिक म्हणतात… 

प्रभागातील अनेक उद्याने बंद-नादुरुस्त आहेत. मैदानांचा, स्ट्रीट लाइटचा प्रश्न सोडवला पाहिजे. अनेक ठिकाणचे पेव्हरब्लॉक उखडले असून, ते दुरुस्त केले पाहिजे. प्रभागात दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित आहे. – भुवनेश कडलग, बांधकाम व्यावसायिक

प्रभागात मोठे वाचनालय उभारले गेले पाहिजे. तेथे सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत. जेणेकरून विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्याचा फायदा होईल. भुयारी गटार योजना व इतर विकासकामांमुळे काही कॉलनी रस्ते खराब झाले आहेत. ते तातडीने दुरुस्त करावेत. – प्रा. दिलीप कुट

मुलांसाठी प्रशस्त मैदाने हवीत. सायकल ट्रॅकही तयार करणे अपेक्षित आहे. गर्दीच्या भागात वाहनतळाची समस्या वाढत असल्याने तेथे वाहनतळ उपलब्ध करून दिले पाहिजे. नदी किनारा सुशोभीकरण व तेथे वॉकिंग ट्रॅक तयार करावा. विकासकामांमुळे रस्ते खोदतात, मात्र त्यानंतर रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित होत नसल्याने त्याचा त्रास होत आहे. – अ‍ॅड. जालिंदर ताडगे, रहिवासी

प्रभागातील फुटपाथवर काही प्रमाणात अतिक्रमण किंवा वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे पादचार्‍यांना पायी चालण्यास अडचणी येतात. ही अडचण सोडवावी त्याचप्रमाणे नव्याने फुटपाथ तयार करावे. उद्याने सुस्थितीत ठेवावीत.
– डॉ. सोनाली मोरे, रहिवासी

भागातील काही परिसरात स्वच्छता नाही. काही मार्गांवर खडीकरण झाले, मात्र डांबरीकरण झालेले नाही. पेव्हरब्लॉक उखडलेले आहेत. काही परिसरातील तारा भूमिगत केलेल्या नाहीत.
– किशोर सावंत, व्यावसायिक

हेही वाचा :

Back to top button