सोलापूर : रस्‍त्‍याचे काम पुढे काम चालू आणि मागे पडले खड्डे | पुढारी

सोलापूर : रस्‍त्‍याचे काम पुढे काम चालू आणि मागे पडले खड्डे

सांगोला (जि. सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : 
एखतपूर ते गोडसेवाडी, वासूद, अकोला या रस्त्याचे बी.बी.एम. (डांबरयुक्त खडीकरण ) काम दोन महिन्यांपूर्वी झाले आहे. पण, हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्याने या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. रस्ता रुंदीकरणाचे खडीकरण करण्याचे काम दोन थरांमध्ये असताना ते एका थरात केले आहे. याचे रोलिंगही करण्यात आले नाही. यामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. याची चौकशी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्र.जि.मा. 182 ते एखतपूर ते गोडसेवाडी, वासुद, अकोला रा.मा . 125 रस्ता प्र.जि.मा. 195 कि.मी. 10/00 ते 15/00 या रस्त्याच्या साईडपट्टी रुंदीकरण व डांबरी करणासाठी मंजूर करुन वर्कऑर्डर दिली आहे. या रस्त्यासाठी 1 कोटी 40 लाख 53 हजार 867 रुपयांचे काम आहे तसेच जीएसटी व इतर चार्जेस धरुन हे काम 1 कोटी 67 लाख 71 हजार रुपयांचे आहे.

या रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून चालू करण्यात आले आहे. या पाच किलोमीटरच्या रस्त्यामध्ये सध्या साईडपट्टी खोदाई करुन ती भरण्यात आली आहे तसेच साईडपट्टी व रस्ता असे, बी.बी.एम.चे काम गेल्या दीड महिन्यांत पूर्ण झाले आहे. फक्त डांबरीकरणाचे काम बाकी आहे. पण हे काम अंदाजपत्रकानुसार चालू नाही. या कामामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस रुंदीकरण करावयाचे आहे, ते पण दोन थरात. पण हे काम करत असताना ठेकेदाराने हे रुंदीकरण एकाच खडीच्या थरात केले आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाच्या ठिकाणी साईडपट्टी खोदाई न करता खडी टाकून बी.बी.एम. केले आहे. हे रुंदीकरण करत असताना अंदाजपत्रकात रुंदीकरणाची खोदाई करण्याची रुंदी ही 1.80 इतकी आहे. पण प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराकडून 0.15 मीटर ते 0.20 मीटर एवढ्याच रुंदीचे हे काम केले आहे. त्यामुळे रुंदीकरण करत असताना आवश्यक तेवढी रोलिंगची दबाई झालेली नाही.

यामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी व हा रस्ता दर्जेदार करावा, अशी मागणी जनतेमधून केली जात आहे.

दीड महिन्यांत पडले खड्डे

या रस्त्याचे पहिल्या असलेल्या डांबरीकरणाची काही ठिकाणी खोदाई न करताच पहिल्या डांबरीकरणावरच बीबीएम करण्यात आले आहे. हे काम करताना दर्जाहिन डांबर वापरले आहे. यामुळे बीबीएम होऊन दीड महिना झाला तोपर्यंत या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी व डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत व पडू लागले आहेत.

हे ही वाचलं का 

Back to top button