मालेगाव : आठ कोटींच्या उर्दू घराला देणार हिजाब समर्थक मुस्कान खानचे नाव | पुढारी

मालेगाव : आठ कोटींच्या उर्दू घराला देणार हिजाब समर्थक मुस्कान खानचे नाव

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : हिजाब बंदीसाठी दबाव टाकणार्‍या जमावाला न घाबरता स्वत:च्या हक्कासाठी ‘अल्ला हू अकबर’चा नारा देणार्‍या कर्नाटकमधील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव शहरातील ‘उर्दू घर’ला देण्यात येईल, अशी घोषणा महापौर ताहेरा शेख यांनी केली. गुरुवारी (दि.10) मालेगाव महापालिकेतील आपल्या दालनात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

कर्नाटकच्या उड्डपीमध्ये हिजाब बंदीच्या अंमलबजावणीसाठी काही तरुणांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत महाविद्यालय आवारात गोंधळ घातला. या घटनेच्या अनुषंगाने बोलताना महापौर शेख म्हणाल्या, हे जे काही घडले ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेलेल्या मुस्कान खान हिच्या शौर्याला सलाम करण्यासाठी शहरात आठ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत अशा उर्दू घराला तिचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

भारत हा गंगा-जमुना संस्कृतीचा देश आहे. सर्वधर्मीयांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. कर्नाटक सरकारच्या हिजाब बंदीविरोधात हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांना धैर्य देण्याचे काम मुस्कानने केले. तिच्या धाडसाचे बक्षीस तसेच इतर महिलांना हिंमत देण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला असून, त्यात कोणतेही जातीय राजकारण नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. येत्या महासभेत उर्दू घराच्या नामकरणाचा निर्णय घेतला जाईल, त्यास सर्व सदस्यांनी समर्थन द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी माजी महापौर शेख रशीद, सभागृहनेते असलम अन्सारी आदी उपस्थित होते.

भाजपचे जातीय राजकारण
माजी महापौर शेख रशीद म्हणाले की, कर्नाटक सरकारचा हिजाबबंदीचा निर्णय घटनाविरोधी आहे. मुस्लिम विद्यार्थिनींचा छळ केला जात आहे. मुस्लिम धाडसी मुलगी मुस्कान खान भगव्या सैन्याविरुद्ध लढली. तिचा आम्हाला गर्व आहे. पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकार हिंदू-मुस्लिम राजकारण करत असले तरी हे प्रकरण न्यायालयात असून, तेथे न्याय होईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button