सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा गजर | पुढारी

सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा गजर

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील लोणंद, खंडाळा, दहिवडी, कोरेगाव, पाटण या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. या निवडीत कोरेगाव वगळता ‘राष्ट्रवादी पुन्हा’ असाच गजर झाला. खंडाळा, लोणंद, दहिवडी, पाटण या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीने बाजी मारली. कोरेगावात मात्र शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला दोन्ही पदे मिळाली.

जिल्ह्यातील खंडाळा, लोणंद, दहिवडी, कोरेगाव, वडूज, पाटण या सहा नगरपंचायतींची रणधुमाळी संपल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे या निवडीतही राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे दिसून आले. केवळ कोरेगाव नगरपंचायतीत आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष झाले. वडूज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड शुक्रवारी होणार आहे. मात्र, त्यामध्येही केवळ औपचारिकताच बाकी आहे.

लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. मधुमती सागर पलंगे- गालिंदे व उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेस, भाजपा उमेदवाराचा पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी सौ. मधुमती पलंगे- गालिंदे व काँग्रेसच्या सौ. दिपाली निलेश शेळके यांच्यात लढत झाली, त्यात सौ. मधुमती पलंगे- गालिंद यांनी बाजी मारली. तर, उपनगराध्यक्षपदासाठी शिवाजीराव शेळके यांनी भाजपाच्या सौ. दिपाली संदीप शेळके यांचा पराभव केला.

खंडाळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नंदाताई गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी सुधीर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 तर भाजपाचे 7 सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत प्रथम नगराध्यक्ष म्हणून नंदाताई गायकवाड यांची निवड करण्यात आली. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सुधीर सोनावणे, भाजपाकडून संदीप जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र संदीप जाधव यांनी अर्ज माघारी घेतल्याने सुधीर सोनावणे यांची वर्णी लागली.

दहिवडी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकला असून नगराध्यक्षपदी स्व. वाघोजीराव पोळ यांचे नातू सागर पोळ तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.

कोरेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत एकहाती वर्चस्व सिध्द केलेल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव विकास आघाडीच्या सौ. दिपाली महेश बर्गे यांची तर उपनगराध्यक्षपदी सुनील बाळासाो बर्गे यांची बिनविरोध निवड झाली.

पाटण नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कांबळे यांची निवड झाली असून उपनगराध्यक्षपदी सागर पोतदार यांची वर्णी लागली आहे.

वडूजमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्षाला लॉटरी

वडूज नगरपंचायतीत राष्ट्रवादी पाच, भाजप सहा, अपक्ष चार, वंचित बहुजन आघाडीचा एक, काँग्रेस एक असे बलाबल आहे. निवडणूक निकालाच्या दुसर्‍याच दिवशी तीन अपक्ष व वंचित आघाडीचा एक सदस्य हे केलेली मदत लक्षात ठेवून राष्ट्रवादीच्या ताफ्यात सामील झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. भाजपच्या रेखा माळी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष मनीषा काळे यांच्या निवडीची शुक्रवारी घोषणा होणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे.

Back to top button