तळवडे दरोड्यातील नऊजणांवर ‘मोका’ | पुढारी

तळवडे दरोड्यातील नऊजणांवर ‘मोका’

सरूड ; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येथील सशस्त्र दरोड्यातील सराईत नऊ आरोपींविरुद्ध ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर खून, दरोडा, मारामारी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

कारवाई करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे ः सचिन रामचंद्र नाचनकर (वय 37, रा. कोतोली, ता. शाहूवाडी), मंदार तानाजी चोरगे (34, रा. अवधूत कार्टेक, भारती विद्यापीठ, कात्रज, पुणे), शिवाजी हरिबा कदम (रा. अमेणी, ता. शाहूवाडी), नामदेव ऊर्फ अविनाश जालिंदर कदम (26, रा. पाडळेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली), शुभम ऊर्फ सोन्या शंकर चोरगे (22, रा. वांगणी, ता. वेल्हा, जि. पुणे) हे पाच आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर विशाल ऊर्फ आल्या अरुण वाल्हेकर (रा. सुंदरनगर, गुजरवाडी, कात्रज, पुणे), लक्ष्मण अण्णा जाधव (आळंदी रोड, दिघी, पुणे), सूरज बर्डे व ओंकार ऊर्फ तेड्या (दोघांचीही पूर्ण नावे व पत्ता माहीत नाही) या चौघांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

या आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण, पुणे शहर, मुंबई, नवी मुंबई शहर व परिसरात खून, दरोडा, मारामारी, चोरी आदी गंभीर गुन्ह्यांची पोलिस दफ्तरी नोंद आहे.

संबंधित गुन्हेगारांकडून जनतेच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999, कलम 23 (1) (अ) अन्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाठविला होता. त्यास विशेष पोलिस महानिरीक्षकांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

…यांच्यावर यापूर्वी दोनदा ‘मोका’अंतर्गत कारवाई

दरम्यान, विशाल ऊर्फ आल्या अरुण वाल्हेकर, लक्ष्मण जाधव, सूरज बर्डे व ओंकार ऊर्फ तेड्या यांच्याविरुद्ध यापूर्वीही दोनवेळा ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई केलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे तसेच कोल्हापूर पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

Back to top button