पेट्रोल पंपावरील 27 लाखांची रोकड लुटणार्‍या 5 जणांना अटक

पेट्रोल पंपावरील 27 लाखांची रोकड लुटणार्‍या 5 जणांना अटक
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे शहरातील कापूरबावडी नाक्यावरील ब्रॉडवे आटोमोबाईल्स एचपीसीएल या पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचा दरवाजा नकली चावीने उघडून तिजोरीतील 27 लाख 50 हजारांची रोकड लांबविणार्‍या पाच चोरट्यांना कापूरबावडी पोलिसांनी सातारा, सांगली आणि ठाण्यातून अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पेट्रोल पंपावरील माजी कर्मचार्‍याचा समावेश आहे. एक आरोपी सध्या याच पंपावर काम करीत होता. तर त्यांचे इतर तीन साथीदार अट्टल गुन्हेगार आहेत. नयन पवार (वय 20, रा. खेराडेवांगी, ता. कडेगाव, जिल्हा सांगली), रिलेश मांडवकर (वय 29, रा. कापूरबावडी नाका, ठाणे), सुधाकर मोहिते (वय 34, रा. मु. पो. भिकवडी खुर्द, ता. कडेगाव, जिल्हा सांगली), विनोद कदम (वय 26, रा. पांढरवाडी, ता. खटाव, जिल्हा सातारा), भास्कर उर्फ संभाजी सावंत (वय 27, रा. कोतीज, ता. कडेगाव, जिल्हा सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

या चोरट्यांच्या ताब्यातून चोरलेल्या 27 लाख 50 हजारांपैकी 15 लाखाची रोकड, घरफोडी करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळ तसेच इतर ठिकाणचे तब्बल 35 सीसीटीव्ही फुटेज पडताळून बघितले होते. यावेळी चोरट्यांनी आपला चेहरा मास्क व टोपीने झाकून ठेवल्याचे आढळून आले. तसेच, पेट्रोलपंपाच्या कार्यालयाचा दरवाजा आटोमॅटिक लॉक असल्याने नकली चावीने उघडला असावा असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे या चोरीत पेट्रोलपंपावर काम करणार्‍या अथवा काम सोडून गेलेल्या कर्मचार्‍याचा सहभाग असावा असे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी पंपावर काम करणार्‍या तसेच काम सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांची माहिती मिळवली असता या पंपावरचे काम सोडून गेलेला कर्मचारी नयन पवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनस्थळाचे सीसीटीव्हीची नव्याने पडताळणी केली असता एका चोरट्याची शरीरयष्टी नयन पवार याच्याशी जुळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याचे सांगली जिल्ह्यातील खेराडेवांगी गाव गाठून त्यास अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या चारही साथीदारांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.

चोरीची रक्कम जमिनीत पुरली

चोरट्यांनी पेट्रोप पंपावरील रक्कम लुटून नेल्यानंतर ते आपल्या गावाकडे रवाना झाले होते. चोरीच्या रकमेपैकी काही रक्कम या चोरट्यांनी खर्च केली तर उर्वरित रक्कम विनोद गुलाब कदम याच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी देण्यात आली होती. विनोदने ही रक्कम त्याच्या पांढरवाडी, (ता. खटाव, जिल्हा सातारा) येथील घरात जमिनीत पुरून ठेवली होती. पोलिसांनी ही रोकड जमिनीतून उकरून काढली असता ती 15 लाख 900 रुपये इतकी निघाली. पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news