हिजाब मुस्लिम महिलांचा संवैधानिक अधिकार ; मालेगावच्या मुस्लिम महिलांचा नारा | पुढारी

हिजाब मुस्लिम महिलांचा संवैधानिक अधिकार ; मालेगावच्या मुस्लिम महिलांचा नारा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संविधानाने प्रत्येक देशवासीयाला त्याच्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार मुस्लिम महिलांचा हिजाब-बुरखा परिधान करण्याचा संवैधानिक हक्क आहे. तो कुणीही काढून घेऊ शकत नाही, असा नारा मालेगावच्या मुस्लिम महिलांनी दिला.

शहरातील जमियत उलेमा या संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.10) अजिज कल्लू मैदानावर महिलांची सभा घेण्यात आली. त्यात जमियतचे अध्यक्ष तथा एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी कायदा आणि धार्मिकतेच्या मुद्यावर प्रबोधन केले.

हिजाब बंदीविरोधात कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दक्ष राहून संवैधानिक अधिकार्‍यांचे रक्षण करावे. महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जमियत उलेमा या संघटनेने केली आहे. यासंदर्भात आमदार मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले. पोलिस उपअधीक्षक लता दोंदे यांनी निवेदन स्वीकारले. कर्नाटक शासनाने राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ड्रेसकोडच्या आधारे बुरखा व हिजाब परिधान करून प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून सुरु झालेल्या वादाने मालेगावातील राजकीय-सामाजिक व धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ही सभा घेतली गेली. त्यात हजारो महिलांनी बुरखा परिधान करुन सहभाग नोंदवला.

कर्नाटकमध्ये बुरखाधारी विद्यार्थिनीला जमावाने घेरण्याचा प्रयत्न झाला. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असून, तो महिला सुरक्षिततेच्या द़ृष्टीने धोकादायक आहे. ही परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने सतर्क राहून महिलांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमास एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अर्धे नंगे राहणार्‍यांना कोणी पूर्ण अंग झाकण्यासाठी सांगत नाही. परंतु, मुस्लिम महिला धार्मिक रीतिरिवाजानुसार परदा करत असतील तर त्यांना बेपर्दा करण्याचा प्रयत्न होतोय. हा एकूणच प्रकार संविधानाच्या विरुद्ध आहे. घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आम्ही मुस्लिम महिलांना संघटित करत त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. कुणीही बुरखा आणि हिजाब घालण्यापासून रोखू शकत नाही.
मौलाना मुफ्ती मो. इस्माईल,
आमदार, एमआयएम, मालेगाव

हिजाबबंदी मतांच्या ध्रुवीकरणासाठी
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवून मतांच्या ध्रुवीकरणासाठी हिजाबबंदीचा वापर केला जात असल्याचा आरोपही आमदार मुफ्ती यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

Back to top button