पेठ तालुक्यातील या तीन गावांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण ; आता एसएनएफ भागविणार या गावांची तहान | पुढारी

पेठ तालुक्यातील या तीन गावांना पाण्यासाठी करावी लागतेय वणवण ; आता एसएनएफ भागविणार या गावांची तहान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :  चांगल्या कामाला सुरुवात करायचा अवकाश की, शेकडो हात सोबत येतात, हा अनेक वर्षांचा अनुभव याही वर्षी आला. सोशल नेटवर्किंग फोरमच्या (एसएनएफ) टँकरमुक्तीसाठीच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या वर्षी एसएनएफने हाती घेतलेल्या तीन गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी 12 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली. पेठ तालुक्यातील डोंगरशेत, चिरेपाडा आणि मोहाचा पाडा ही तीन गावे अनेक वर्षे तहानलेलीच आहेत.

डिसेंबर महिना संपला की, या तिन्ही गावांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात. दर्‍याखोर्‍यातून पाणी आणावे लागते. काही महिन्यांपूर्वी एसएनएफच्या सहकार्‍यांनी गावांची पाहणी करून एक पर्याय शोधला. तथापि, निधीची अडचण होती. या संदर्भातील प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच रोटरी क्लब ऑफ नाशिकला दिला. त्यावर तातडीने निर्णय घेत तिन्ही गावांसाठी सिन्नरच्या अ‍ॅटोकॉप प्रा. लि. कंपनी आणि रोटरी क्लबने मदतीचा हात दिला. या आर्थिक योगदानाच्या बळावर उत्साहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. गावापासून चार किलोमीटर अंतरावरील दमण नदीच्या काठी गावकर्‍यांनी श्रमदानातून विहीर खोदण्यास प्रारंभ केला. लवकरच या गावांचा पाणी प्रश्न संपेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

निधी उभारण्याच्या कामात अ‍ॅटोकॉप प्रा. लि.चे संचालक अरविंद नागरे, वृषाली नागरे, अरविंद नामजोषी, अनिल साळी, प्रतापसिंगधाडीवाल, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी, सचिव मंगेश अपशंकर, विनायक देवधर, सीएसआर प्रतिनिधी कमलाकर टाक, सदस्य सुजाता राजेबहादूर, दत्तक ग्राम प्रतिनिधी हेमराज राजपूत, सेवा कार्य प्रतिनिधी रामनाथ जगताप, एसएनएफचे निधी संकलक डॉ. पंकज भदाणे यांनी विशेष प्रयत्न केले. योजना कार्यान्वित होण्यासाठी एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, अभियंता प्रशांत बच्छाव, संदीप बत्तासे, दिलीप चौधरी, रामदास शिंदे तसेच ग्रामस्थ श्रीराम भांगरे, माजी सरपंच परशराम भांगरे, ग्रामसेवक दीपक भोये, हिराबाई सहारे आदी उपस्थित होते.

येत्या दोन महिन्यांत ही तिन्ही गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होताना पाहणे, हे आमच्यासाठी खूपच आनंददायी असेल.
– श्रीया कुलकर्णी, रोटरी नाशिक

तहानलेल्या लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे मनापासून समाधान आहे.
– अरविंद नागरे, अ‍ॅटोकॉप प्रा. लि

गावकर्‍यांचे श्रमदान, देणगीदारांचे आर्थिक योगदान आणि एसएनएफचा तांत्रिक समन्वय या माध्यमातून लवकरच हे काम यशस्वीपणे पूर्ण होईल.
– डॉ. पंकज भदाणे, एसएनएफ

हेही वाचा :

Back to top button