हिट अँड रन प्रकरण : पुण्याच्या बिल्डर अगरवालसह तिघांना संभाजीनगरमधून अटक

हिट अँड रन प्रकरण : पुण्याच्या बिल्डर अगरवालसह तिघांना संभाजीनगरमधून अटक

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-कल्याणीनगर परिसरात पोर्श कारने दोघांना चिरडणार्‍या अल्पवयीन कारचालकाचा वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालसह तिघांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातून मंगळवारी (दि. 21) पहाटे अटक केली. पुणे पोलिसांकडून विशाल अगरवाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून तो फरार होता. संभाजीनगरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये तो असल्याची माहिती मिळाली होती.

विशाल सुरेंद्र अगरवाल (वय 50, ब्रह्मासन सिटी, वडगावशेरी, पुणे) चत्रभूज बाबासाहेब डोळस (34, वडगाव शेरी, भाजी मार्केट, पुणे) आणि राकेश भास्कर पौडवाल (51, चव्हाणनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कल्याणीनगर परिसरात विशाल अगरवाल या बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षीय मुलाने पोर्श या आलिशान कारने दुचाकीला जोराची धडक दिली होती. यात दुचाकीवर स्वार असलेले आयटी इंजिनिअर अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठा या दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते. परंतु, त्याला 10 तासांतच जामीन मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेतला होता. यादरम्यान याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल फरार झाला होता.

विशाल सुरेंद्र अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वेस्टेशन परिसरातील जेम्स प्लाझा हॉटेलमध्ये, तर त्याचे साथीदार चत्रभूज बाबासाहेब डोळस आणि राकेश भास्कर पौडवाल हे दोघे नारळीबागेतील जे. पी. इंटरनॅशनल हॉटेलमध्ये दडून बसले असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पुणे पोलिसांनी संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने मंगळवारी पहाटे या दोन्ही हॉटेलवर छापे मारून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुण्याला नेण्यात आले.

'ती' पोर्श कार बंगळूरमधून आणली

पब पार्टी आणि अपघातातील बिल्डर विशाल अगरवाल यांची सव्वादोन कोटी रुपये किमतीची पोर्श कार बंगळूर शहरातून विकत घेतली असून, तिची नोंदणी पुणे आरटीओत करणे गरजेचे होते. त्यामुळे ती गाडी तात्पुरत्या स्वरूपातच चालविली गेली. त्यामुळे हा विषय आता आमच्या अखत्यारित राहिलेला नाही, असे स्पष्टीकरण पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिले.
पोर्श कारचा परवाना होता का, तिची किंमत काय, आता आरटीओ काय कारवाई करणार, या प्रश्नांवर प्रथमच पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बोलले. ते म्हणाले की, पोर्श कार विशाल अगरवाल यांनी बंगळूर शहरातून मार्च 2024 मध्ये विकत घेतली. ही कार इलेक्ट्रिक असल्याने त्यावर कर लावला जात नाही. त्यामुळे केवळ 1,700 रुपये नोंदणी फी भरणे अपेक्षित होते. नव्या कारची नोंदणी करण्याची जबाबदारी कारमालकाचीच असते. परंतु, त्यांनी नोंदणी केली नाही. तेवढ्यात हा अपघात झाला.

दोनच महिन्यांत अपघात

विशाल अग्रवाल यांनी बंगळूर येथून 18 मार्च रोजी कार घेतली. तिचा तात्पुरता परवाना मिळाला होता. तो सहा महिने चालतो. मात्र, आरटीओ, भोर यांच्या म्हणण्यानुसार, 1758 रुपये भरून तिची नोंदणी पुणे आरटीओ कार्यालयात करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी ही नोंदणी केली नाही. त्यामुळे या वाहनाशी पुणे आरटीओ कार्यालयाचा कायदेशीर संबंध येत नाही. आता ही कार पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आम्ही कुठलीही कारवाई करू शकत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news