मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पाचही टप्प्यांत 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदान विचारात घेता सर्वाधिक 71.88 टक्के मतदान चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात झाले आहे. कोल्हापूर 71.59 टक्क्यांसह या यादीत दुसर्या, तर हातकणंगले 71.11 टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
70 टक्के वा त्याहून अधिक मतदान राज्यात केवळ पाच लोकसभा मतदारसंघांतच झाले. सर्वाधिक मत टक्केवारीतील पहिल्या तीन मतदारसंघांसह बीड (70.92 टक्के), तर नंदुरबार (70.68 टक्के) यांचा यात समावेश होतो. 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक आणि 70 टक्क्यांहून कमी मतदान झाले. दुसर्या टप्प्यातील आठही मतदारसंघांत 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, हे विशेष!
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यासाठीच्या अंतिम टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह 13 मतदारसंघांत सोमवारी झालेल्या मतदानाच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत 24 तासांत सरासरी 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याचा या टप्प्यातील मतटक्का 56.89 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सुधारित आकडेवारीनंतर राज्यातील चारही टप्प्यांपेक्षा पाचव्या टप्प्यात किमान 6 टक्के कमी मतदान झाल्याचे स्पष्ट असून, हा टप्पा नीचांकी टक्केवारीसाठी ओळखला जाईल.
राज्याच्या पाचही टप्प्यांतील मतदान लक्षात घेतले असता, राज्यात लोकसभा निवडणुकीत 61.81 टक्के मतदान झाले आहे. 2019 ची राज्याची सरासरी 61.02 टक्के लक्षात घेता यावर्षी किंचित अधिक मतदान झाले आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारीही दिंडोरीतच सर्वाधिक मतदान झाले असून, सोमवारच्या तुलनेत हा आकडा 4 टक्क्यांनी वाढला आहे.
दिंडोरीत आता मतटक्का 66.75 टक्क्यांवर पोहोचला असून, त्याखालोखाल पालघरमध्ये 63.91 टक्के, तर नाशिकमध्ये 60.75 टक्के मतदान झाले आहे.
सोमवारी राज्यात नीचांकी मतदान कल्याण (47.08 टक्के) आणि दक्षिण मुंबईत (47.10 टक्के) झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. यात मंगळवारी सुधारणा झाल्याने आता दक्षिण मुंबई मतदारसंघाने नीचांकी मतदान नोंदवले असून, त्याच्या आकडेवारीच्या जवळपासच कल्याणही आहे. दक्षिण मुंबईत 50.06 टक्के, तर कल्याणमध्ये 50.12 टक्के नोंदविले गेले आहे.
मतदानाच्या दिवशी सोमवारी रात्री 11 वाजता जाहीर करण्यात आलेल्या मतटक्क्याशी तुलना केल्यास मंगळवारी सर्वच मतदारसंघांतील मतटक्क्यात वाढ झाली. दिंडोरी आणि धुळे प्रत्येकी 4 टक्के, नाशिक, कल्याण आणि ठाणे प्रत्येकी 3 टक्के, भिवंडीत साडेतीन टक्के, तर पालघरमध्येही 2 टक्क्यांनी मतटक्का वाढला आहे.
देशाची आर्थिक राजधानी ही ओळख मिळवून देणारी प्रमुख संस्था वा कार्यालये असलेला आणि कमी मतदानासाठी ओळखल्या जाणार्या दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात सोमवारच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, तरीही 2019 च्या तुलनेत हा मतटक्का अद्याप कमीच आहे. उत्तर मुंबईने मुंबईतील सर्वाधिक मतदान झालेला लोकसभा मतदारसंघ ही आपली सोमवारची ओळख मंगळवारीही कायम राखली, तर दक्षिण मुंबईनेही सर्वात कमी मतदान झालेला मतदारसंघ ही ओळखही कायम राखली.
मुंबईतील केवळ सहा लोकसभा मतदारसंघांचा विचार केला असता, सोमवारी रात्री 11 पर्यंत मतदानाची सरासरी 52.17 टक्के होती. मतटक्क्यात वाढ झाल्याने ही सरासरी मंगळवारी 53.97 टक्क्यांवर पोहोचली आहे.
पाचव्या टप्प्यात सरासरी 56.89 टक्के मतदान
* राज्याचा एकत्रित मतटक्का 61.81
* 2019 इतकेच राज्यात मतदान
* दिंडोरीत सर्वाधिक 66.75 टक्के मतदान
* मुंबईत सरासरी 53.97 टक्के मतदान