Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी, मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित | पुढारी

Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला 'शासन आपल्या दारी, मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अखेर मुहूर्त ठरला. नाशिकमध्ये दि. १४ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अवघ्या आठ दिवसांचा कालावधी हाती असल्याने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.

राज्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमा अंतर्गत नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १४) कार्यक्रमाचे आयोेजन करण्यात आले आहे. गंगापूर रोेडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नाशिकमध्ये यापूर्वी शनिवारी (दि. ८) हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात झाले होते. पण, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात दि. १५ जुलैला कार्यक्रम घेण्याचे जवळपास निश्तित झाले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (दि. ६) तसे संकेतही दिले होते. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयाने १४ तारीख निश्चित केल्याने प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान, यापूर्वी तपोवनातील मोदी मैदानावर हाेणाऱ्या कार्यक्रमासाठी तालुक्यांना ७५ हजार लाभार्थींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, आता हा सोहळा डोंगरे वसतिगृहावर होणार आहे. तेथील मैदानाची क्षमता विचारात घेता, ३० ते ३५ हजार लाभार्थींचे उद्दिष्ट देण्यात आल्याने तालुक्यांवरील भार काहीसा कमी झाला आहे.

सूक्ष्म नियोजनावर भर

राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा नाशिकचा कार्यक्रम उजवा ठरावा, यासाठी जिल्हा प्रशासन जय्यत तयारी करत आहे. पावसाचे दिवस बघता, कार्यक्रमस्थळी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच कार्यक्रमासाठी नाशिक शहर व लगतच्या तालुक्यांमधून लाभार्थींना मोठ्या प्रमाणात आणले जाणार आहे. मालेगाव, पेठ, सुरगाणा अशा लांबच्या तालुक्यांतून प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना नाशिकमध्ये आणण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अशा केली आहे तयारी 

– एसटी महामंडळाच्या ५०० बसेसचे बुकिंग

– स्मार्ट सिटीच्या १०० बसेस दिमतीला

– लाभार्थींसाठी जेवण व पिण्याच्या पाण्याची सुविधा

– कार्यक्रमस्थळी विविध विभागांचे २५ ते ३० स्टॉल

– आरोग्य शिबिर व रोजगार मेळाव्याचे आयोजन

– कृषी विभागाच्या योजनांचे सादरीकरण

हेही वाचा : 

Back to top button