

लेह (लडाख) : पुढारी ऑनलाईन, भारतीय सैन्याने पूर्व लडाखमधील सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये रणगाडे आणि सशस्त्र वाहनांसह युद्धसराव केला आहे. शत्रुला धडकी भरवणारा हा युद्धसराव असून याचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. यात लष्कराचे रणगाडे सिंधू नदी ओलांडताना दिसत आहेत.
आर्मीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा प्रकारचा युद्धसराव आकस्मिक परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी केला जातो. या भागातील खोऱ्यांतील मार्गाचा वापर करुन जर शत्रुंनी भारतीय हद्दीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर हल्ला केला जाईल. त्यासाठी आमची युद्ध यंत्रणा सज्ज आहे. जर कोणी आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
भारतीय सैन्याच्या T-90 आणि T-72 आणि BMP पायदळ लढाऊ वाहनांतून हा युद्धसराव करण्यात आला. भारतीय सैन्य हे जगातील अशा काही सैन्यांपैकी एक आहे जे १६ हजार फूट उंचीवर आणि मोठ्या संख्येने रणगाड्याचा वापर करते.
पूर्व लडाख सेक्टरमध्ये चिनी सैन्याने युद्ध सरावादरम्यान आगळीक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता भारतीय सैन्याने पूर्व लडाख सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि सशस्त्र वाहने तैनात केली आहेत. सिंधू नदीचे विस्तीर्ण खोरे रणगाड्यातून लढाईसाठी अतिशय अनुकूल आहे.
यापूर्वी भारतीय सैन्य पाकिस्तान सीमारेषेला लागून असलेल्या पंजाब सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात असा युद्धसराव करत असे. कारण असे मानले जात होते की केवळ मैदानी आणि वाळवंटातच लढाईसाठी रणगाड्यांचा वापर होईल. पण आता रणनिती बदलली आहे.
२०१३-१४ पासून पूर्व लडाखमध्ये रणगाड्यांसह ब्रिगेड्स आणि इतर फॉर्मेशन्स सैन्यात सामील होण्यास सुरुवात झाली. पण २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर त्यांची संख्या अनेक पटींनी वाढली. या घटनेनंतर भारतीय हवाई दलाच्या C-17 आणि Ilyushin-76 वाहतूक विमानांतून वाळवंट आणि मैदानी प्रदेशातून मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि BMP पायदळ लढाऊ वाहने आणण्यात आली. शत्रूच्या कोणत्याही आगळिकीचा सामना करण्यासाठी लष्कराने या भागातील शस्त्रशक्ती मजबूत केली आहे.
हे ही वाचा :