नेवासा नगरपंचायतीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव 20-25 लाखांवर..! | पुढारी

नेवासा नगरपंचायतीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव 20-25 लाखांवर..!

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा नगरपंचायतीच्या व्यापारी संकुलामधील 44 गाळ्यांमधील आरक्षित गाळे वगळता इतर गाळ्यांचा बंद पाकिटांमधून लिलाव करण्यात आला. काही गाळ्यांचा लिलाव 20-25 लाखांवर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेवासा शहरातील व्यावसायिकांच्या सोयीसाठी व बाजारपेठेत भरभराट येण्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नगरपंचायतीकडून बाजारतळावर सुमारे 44 गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारण्यात आलेले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने या गाळ्यांचा लिलाव लांबत चालला होता. अखेर शुक्रवारी (दि.7) मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली गाळ्यांची लिलाव प्रकिया पार पडली. हा लिलाव दिवसभर नगरपंचायतीच्या ज्ञानेश्वर सभागृहात टप्प्याटप्प्यात करण्यात आला. यावेळी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

संकुलातील 44 गाळ्यांमधील काही गाळे आरक्षित करण्यात आलेले आहेत. राहिलेल्या गाळ्यांसाठी लिलाव पद्धतीने बंद पाकिटांमधून अर्ज मागविण्यात आले होते. काही गाळ्यांची बोली 20 ते 25 लाखांवर गेल्याने अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत. नगरपंचायतीने या व्यापारी संकुलाचे तीन मजली बांधकाम केलेले आहे. दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील गाळ्यांची लिलाव बोली कमी प्रमाणात, तर काही गाळ्यांना लिलाव बोली आलीच नाही. खालच्या मजल्यावरील काही गाळ्यांना मात्र 15, 20, 25 लाखांची बोली आल्याचे सांगण्यात आले.

पूर्वीसारखा खेळ होता कामा नये !
नेवाशात यापूर्वीही ग्रामपंचायत असताना ठिकठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. परंतु, त्यावेळी बड्या धेंडांनी सदरचे गाळे घेतले. अनेकांनी पोटभाडेकरू किंवा गोदाम बनविलेले आहेत. तर, काही गाळे बंद अवस्थेत आहेत. हा प्रकार यावेळी होऊ नये, यासाठी नगरपंचायतीने दक्षता घेण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व जाणकारांनी केली आहे.

Back to top button