नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार | पुढारी

नाशिक शहरात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट, रुग्णसंख्या शंभरीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असून, जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरीपार गेला आहे. या काळात १०३ रुग्ण आढळून आले असून, जूनमध्ये सर्वाधिक १३ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. पुढील काही महिन्यांत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र मलेरिया विभाग अद्यापही सुस्त आहे.

पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शहरात दरवर्षी स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंग्यूसह साथीच्या आजारांचे रुग्ण समोर येतात. काही दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसून आले होते. आता स्वाइन फ्लू कमी झाला असतानाच डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: पावसाळ्यात रोगराई आपले बस्तान बसवित असल्याने, या काळात डेंग्यूसह अन्य आजार बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा पावसाळा लांबला असला तरी, जूनच्या शेवटच्या आठवड्यात रिमझिम सुरू झालेल्या पावसाने आता जोर पकडायला सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जूनमध्ये यात भर पडत तब्बल तेरा रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, डेंग्यूबाधितांचा आकडा वाढत असला तरी, महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डेंग्यूला रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना होत नसल्याचेही दिसून येत आहे. औषध, धूरफवारणी, नियमितपणे पेस्ट कंट्रोलचे काम होत नसल्याने पुढील काळात डेंग्यूचा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. अशात सुस्तावलेल्या मलेरिया विभागाने वेळीच धूरफवारणीसह इतर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात स्वाइन फ्लू आटोक्यात असला तरी, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. जानेवारी ते जून महिन्यात १०३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, मनपा

चिकुनगुनियाची भीती

पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असल्याने, चिकुनगुनिया या आजाराचीदेखील भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी चिकुनगुनियाचे बरेच रुग्ण समोर आले होते. अशात नागरिकांनी स्वच्छता राखण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button