मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे | पुढारी

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे

बीड : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी येथे केली. 2024 च्या निवडणुकीत बीडमध्ये इतिहास घडवायचा आहे, असे त्या म्हणाल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले होते, त्यावेळी मी गळ्यात कोणताच फुलांचा हार घालणार नाही, असे म्हटले होते, याकडे मुंडे यांनी यावेळी लक्ष वेधले. ज्या लोकांना आम्ही शब्द दिला, त्यांना दिलेले शब्द पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत फेटा घालण्याची माझी मानसिकता नाही. आम्हाला वैभवाची कमी नव्हती, पायाखालचे काटेही गोड वाटतात. कारण, त्यावर तुमच्या प्रेमाचे आवरण आहे, अशा भावना मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

आलेल्या ऑफरचा गांभीर्याने विचार

सर्व पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर कोणाविषयी मी नकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सीरिअसली बघितले नाही; मात्र मी बघणार नाही, असे नाही. कारण, कोणत्याही व्यक्तीला सीरिअसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

आडवे येणार्‍यांना आडवे पाडणार

आगामी निवडणुकीत 2024 मध्ये बीडमध्ये इतिहास घडविण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. आईप्रमाणे या जिल्ह्याला सांभाळण्याचे काम मी पाच वर्षे केले. मात्र, आपल्याला हवे तसे यश मिळू शकले नाही. या यशामध्ये आडवे येणार्‍या प्रत्येक गोष्टी ओळखून आहे. आता आडव्या येणार्‍या लोकांना आणि गोष्टींना आडवे पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला. यावर बावनकुळे म्हणाले की, 2019 हा अपघात होता, 2024 मध्ये मात्र तसे होणार नाही.

Back to top button