पंढरपुरात आषाढी यात्रेत पाचशे कोटींची उलाढाल | पुढारी

पंढरपुरात आषाढी यात्रेत पाचशे कोटींची उलाढाल

पंढरपूर : यंदाच्या आषाढी यात्रा एकादशी सोहळ्यानिमित्ताने प्रसादिक साहित्य, फोटो फ्रेम, पेढा, श्रींच्या मूर्ती, कुंकू-बुक्का, बेकरी उत्पादने, हॉटेल पदार्थ विक्रीत मोठी उलाढाल झाली. स्थानिक व्यापार्‍यांबरोबर बाहेरगावाहून आलेल्या व्यापार्‍यांनाही ग्राहकांच्या रुपात विठ्ठल भेटल्याची प्रचिती आली. आषाढी यात्रेत किमान 500 कोटींची उलाढाल झाली आहे.

स्थानिक व्यापार्‍यांना अपेक्षित असलेली विक्री झाल्याने कोरोना काळात झालेले नुकसान भरून निघण्यास मदत झाली आहे. जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला असता तर आणखी जास्त दिवस भाविक थांबले असते. वारी आणखी जास्त चांगली असती, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून दिली जात आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे यात्रा बंद होत्या. त्यामुळे बहुतांश भाविक आषाढीला येऊ शकले
नव्हते. यामुळे दरवेळेपेक्षा या यावेळेस भाविकांची संख्या वाढणार, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. आषाढी यात्रा मोठी भरणार हा अंदाज घेऊन स्थानिक व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात माल दुकानांमध्ये भरला होता. ज्या अपेक्षेने माल भरला, त्या अपेक्षेने विक्रीदेखील झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. उरला सुरला माल देखील पुढील महिन्यात सुरू होणार्‍या श्रावण महिन्यामुळे दर्शनाकरिता भाविकांची गर्दी होणार असल्याने विक्री होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यात्रा काळात दशमी, एकादशी व व्दादशीला पाऊस न आल्याने स्थानिक व्यापार्‍यांसह बाहेरगावाहून आलेल्या व्याार्‍यांच्या मालाची चांगली विक्री झाली आहे. पंढरपूरचे अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे. ती आषाढी यात्रा पंढरपुरातील व्यापार्‍यांना फायदेशीर ठरली आहे.

मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, भक्तिमार्ग या ठिकाणी स्थानिक व्यापार्‍यांची कायम स्वरुपी दुकाने, हॉटेल्स होती. स्टेशन रोड, गांधी रोड, बुरूड गल्ली रोड, चप्पल लाइन, टिळकस्मारक, गोपाळपूर रोड, संतपेठ, सांगोला चौक, भोसले चौक रोड, सरगम चौक ते इसबावी रोड, 65 एकर परिसर रोडवर स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेल्या छोट्या छोट्या व्यापार्‍यांनी दुकाने, स्टॉल उभारले होते. व्दादशीला देखील दिवसभर रस्त्यावर दुकाने जसीच्या तसी सुरू होती.

Back to top button