नाशिक : होर्डिंग्ज एजन्सींचा मुजोरपणा; मनपाकडून कारवाईचा बाणा | पुढारी

नाशिक : होर्डिंग्ज एजन्सींचा मुजोरपणा; मनपाकडून कारवाईचा बाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुणे शहरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या कर संकलन विभागाने सावधगिरी म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील खासगी एजन्सींकडून ८४५ होर्डिग्जच्या मजबुतीचे ऑडिट पूर्ण करून घेतले. पण संबंधित एजन्सींनी धोकादायक होर्डिंग्जचा अहवालच मनपाला सादर न केल्याने, मनपाच्या कर संकलन विभागाने एजन्सींना तत्काळ अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र धाडले आहे. तसेच एजन्सींच्या या मुजोरपणाबद्दल त्यांची मान्यता रद्दच्या हालचालीही मनपा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वारे व पावसामुळे होर्डिंग पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे होर्डिंग्जधारकांना दरवर्षी स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) महापालिकेच्या विविध कर विभागाला सादर करावे लागते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जाहिरात करणाऱ्या होर्डिंग्जसाठी स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा महापालिकेने संबंधितांना धाडल्या होत्या. त्यात होर्डिंग मजबूत आहेत की नाही, यासाठी स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. तसेच नाशिक महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात होर्डिंग्जच्या तपासणीचे काम खासगी संस्थांना दिले आहे. प्रारंभी होर्डिंग्जधारकांनी प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ केली. हे पाहून कर संकलन विभागाने प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 30 जूनचा अल्टिमेटम दिला. कारवाईचा इशारा देताच ८४५ होर्डिंग्जची स्थिरता तपासणी पूर्ण करण्यात आली. सबंधित एजन्सींनी तपासणी केली पण धोकादायक, कमी धोकादायक असा विस्तृत अहवाल सादर करणे अपेक्षित होते. परंतु हा अहवालच सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे करसंकलन विभागाला कारवाई करणे अवघड ठरत आहे. होर्डिंग्जधारकांनी खासगी एजन्सीला परस्पर मॅनेज केल्याचा संशय व्यक्त होत असून. उद्या दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्याचे खापर करसंकलन विभागावर फोडले जाईल. ते पाहता तपासणी एजन्सीने लवकरात लवकर धोकेदायक होर्डिंग्जचा अहवाल सादर करावा अन्यथा कारवाईला समोरे जावे, असे पत्र पाठवले आहे.

हेही वाचा:

Back to top button