Ashadhi Wari 2023 : विठू-माउलीच्या भक्तीरसात राजधानी दिल्ली होणार तल्लीन | पुढारी

Ashadhi Wari 2023 : विठू-माउलीच्या भक्तीरसात राजधानी दिल्ली होणार तल्लीन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त राजधानी दिल्लीत सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले आहे. टाळ-मृदंग, फुगड्या घालत, भक्ती नाम स्मरत दिल्लीकर मराठी बांधव विठू-माउलींच्या भक्तीरसात वारीतून न्हाऊन निघणार आहे. उद्या, गुरुवारी (दि.२९) पहाटे बाबा खडकसिंह मार्गावरील हनुमान मंदिर येथून ही वारी सुरू होईल. सकाळी साडेनऊ वाजता आर. के. पूरम सेक्टर-६ येथील विठ्ठल मंदिरात वारीची सांगता होईल. या वारी निमित्त अनेक शतकांचा वैभवशाली इतिहास असलेल्या ‘वारी’चे प्रत्यक्ष दर्शन दिल्लीकरांना होईल. (Ashadhi Wari 2023)
पारंपरिक वेशभूषेत भजन-कीर्तन-फुगडी खेळात तल्लीन होत विठूमाऊलीचे दर्शन-आरती नंतर वारीची सांगता होईल, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.

Ashadhi Wari 2023 : असा असेल वारीचा मार्ग 

हनुमान मंदिर, कॅनाॅट प्लेस, बाबा खडकसिंह मार्ग गोल डाकखाना, डाॅ.राम मनोहर लोहिया हाॅस्पिटल, तीन मूर्ती चौराहा, ११ मूर्ती तिठ्ठा, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शांतीपथ, मोतीबाग फ्लायओव्हर, राव तुलाराम मार्ग, मेजर सोमनाथ पथ, सागर सिनेमा, तमिल संगम, विठ्ठल मंदिर, रामकृष्ण पुरम असा या वारीचा मार्ग असेल.
महाराष्ट्र संस्कृतीच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारी परंपरेत मागील ५ वर्षांपासून दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी होतात. साधारण ८ ते ९ दिवसात आळंदी ते पंढरपूरपर्यंतची मार्गक्रमणा पूर्ण करून विठ्ठलाचा आशीर्वाद समस्त दिल्लीकर बांधवांसाठी घेऊन येतात. याही वर्षी हे वारकरी विठ्ठल दर्शन घेऊन दिल्लीतील या सांकेतिक वारीत सर्वांसमवेत सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा 

Back to top button