धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील | पुढारी

धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईची भिती जाणवू लागली आहे. मात्र धुळे तालुक्यात दुर्देवाने लवकर पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाणी टंचाईला सक्षमपणे सामोरे जाणार असून टंचाई निवारणार्थ निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली.

धुळे तालुक्यातील ज्या गावांना येत्या दहा ते पंधरा दिवसात पाणी टंचाई उदभवण्याची शक्यता आहे. त्या गावांसाठी त्वरीत विहीरी अधिग्रहित करावी, आवश्यक त्या गावांना टँकर सुरु करावेत तसेच विहीरींचे खोलीकरण करुन पाणी टंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी बैठकित दिल्या. दरम्यान नव्याने उभारण्यात आलेली  नेर जलशुध्दकरण केंद्र पूर्ण झाले असून येत्या दहा दिवसात सुरु करण्याच्याही सूचना आ.कुणाल पाटील यांनी यावेळी दिल्या.

धुळे तालुक्यातील पाणी टचांई निवारणार्थ आणि उपाययोजनासाठी आ. कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जि.प.च्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात धुळे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकार्‍यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील प्रत्येक गावांचा पाणी पुरवठ्याबाबतचा आढावा घेतला. यावेळी आढावा बैठकीत बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना युध्दपातळीवर सुरु असून 11 गावांमध्ये खाजगी विहीरींचे अधिग्रहण मंजुर आहे. त्यात उभंड, नवलनगर, धमाणे, सावळी तांडा, जुन्नेर, निकुंभे, सैताळे, नावरी, भटाईदेवी, रतनपुरा, जुनवणे या गावांचा समावेश आहे. तर धुळे तहसिल कार्यालयाकडे विहीर अधिग्रहणासाठी उडाणे, बाबरे, लामकानी, आर्णी, तांडा कुंडाणे, कुळथे या 6 गावांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. बैठकित आ. कुणाल पाटील यांनी कापडणे, सोनगीर, लळींग, जुन्नर, दिवाणमळा, कुसूंबा, नेर, नगाव, बोरकुंड, रतनपुरा, मुकटी, आर्वी, शिरुड, बोरीस, लामकानी, खेडे यांच्यासह धुळे तालुक्यातील प्रत्येक गावांतील पाणी पुरवठ्याबाबत आणि संभाव्य टंचाईबाबत माहिती जाणून घेतली. सरपंचांच्या मागणीनुसार पाणी टंचाई दूर करण्यासाठी विहीरींचे अधिग्रहण करणे, टँकर सुरु करणे, विहीरींचे खोलीकरण करणे, हॅण्डपंप बसविणे अशा आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्याही सूचना दिल्या.

नेर जलशुध्दकरण केंद्र सुरु होणार

टंचाई बैठकीत नेरच्या सरपंच गायत्री जयस्वाल यांनी नेर जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असून ते त्वरीत कार्यान्वित करावे अशी मागणी केली.यावेळी आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की,नेर गावाचा पाणी प्रश्‍न सुटावा आणि शुध्द पाणी मिळावे म्हणून अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना व जलशुध्दीकरण केंद्र आपण मंजुर केले होते. सदर काम पूर्ण झाले असून येत्या दहा दिवसात या जलशुध्दीकरण केंद्रातून नेर ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना आ.पाटील यांनी यावेळी दिल्या. त्यानुसार येत्या दहा दिवसात नेर जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित होणार आहे.

टंचाई आढावा बैठकीला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एस.बी.पड्यार, प्र.कार्य.अभियंता महेश ठाकुर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, कृऊबा संचालक साहेबराव खैरनार, व्ही.एन. वाघ, गटविकास अधिकारी एस.टी.सोनवणे, सहा.गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ, जि.प.सदस्य अरुण पाटील, अशोक सुडके, सहाय्यक अभियंता जयदिप पाटील, शाखा अभियंता विजय गावीत, राहूल सैंदाणे, किर्तीमंत कौठळकर, राजीव पाटील, हरिष पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button