अहमदनगर जिल्ह्यात 3500 शाळांसाठी अवघे 35 केंद्रप्रमुख! | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात 3500 शाळांसाठी अवघे 35 केंद्रप्रमुख!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली तरीही अद्याप शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी इत्यादी संवर्गातील तब्बल हजारो पदे रिक्त आहेत. यात केंद्रप्रमुखांची 246 पैकी केवळ 35 पदे भरलेली असून, 211 जागा रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्था काहीशी कोलमडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे 3500 पेक्षा अधिक शाळा आहेत. 10 ते 12 शाळांवर एक केंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील संबंधित शाळांसाठी 246 केंद्र प्रमुखांची पदे मंजूर आहेत. मात्र सद्यःस्थितीला संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ 35 केंद्रप्रमुख कार्यरत असून, तब्बल 211 पदे रिक्त असल्याने त्या त्या शाळांना केंद्रप्रमुख नसल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे शाळांवरील नियंत्रण, तेथील प्रशासकीय समस्या, विविध योजनांची अंमलबजावणी इत्यादीवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, लवकरच केंद्रप्रमुखांची परीक्षा होत आहे. यातून या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे समजते. शिक्षक भरतीबाबत अजूनही कोणत्याही हालचाली सुरू नसल्याने या रिक्त जागांबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

गणवेश खरेदीचे अहवाल गुलदस्त्यात

शिक्षणाधिकार्‍यांनी किती शाळांनी गणवेश खरेदी केले किंवा नाही, याबाबतचा तालुकानिहाय अहवाल 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठविण्याच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. मात्र, निर्धारित वेळेत यापैकी किती अहवाल मुख्यालयात पोहोचले, याची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अधिकारी वर्गाचेच शाळांवरील नियंत्रण आता ढासळू लागल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

Akshardham Mandir : अक्षरधाम मंदिराजवळ ड्रोन जप्त; बांग्लादेशी महिलेची चौकशी

रुईछत्तीशी : गुंडेगाव परिसरात विजेचा लपंडाव

अहमदनगर : झेडपीतील निविदा प्रक्रिया रद्द करा! आम आदमी पक्षातर्फे उपोषण

Back to top button