नाशिक : होर्डिंग्जधारकांना 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा | पुढारी

नाशिक : होर्डिंग्जधारकांना 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम, 'हे' प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

होर्डिंगमुळे होणारे अपघात लक्षात घेता पावसाळा सुरू होण्याअगोदर होर्डिंग्जधारकांनी ३० जूनपर्यंत स्थिरता प्रमाणपत्र सादर करावे, असा अल्टिमेटमच महापालिकेकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत ८४५ पैकी ६५० होर्डिंग्जधारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले असले, तरी उर्वरित होर्डिंग्जधारकांनी अजूनही प्रमाणपत्र सादर न केल्याने महापालिकेने ३० जून ही अंतिम मुदत दिली आहे.

शहरातील सर्वच भागांत दर्शनी भागात लावण्यात आलेले होर्डिंग पावसाळ्यात धोकादायक बनतात. यामुळे अपघाताच्याही काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पूर्व दक्षता म्हणून सर्व होर्डिंग्जधारकांनी आपल्या होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत ज्या होर्डिंग्जधारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, ३० जूनपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ३० जूननंतरही जे होर्डिंग्जधारक स्थिरता प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांची होर्डिंगची परवानगीच काढून घेण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे शहरात जाहिरात होर्डिंग कोसळून पाच नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नाशिक महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी करण्याचा निर्णय घेताना स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर करण्याचे होर्डिंग्जधारकांना बंधनकारक आहे.

.. तर संस्थेची नोंदणीच रद्द

शहरातील ८४५ पैकी ६५० होर्डिग्जधारकांनी स्थिरता प्रमाणपत्र सादर केल्याने, उर्वरित होर्डिग्जधारकांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्यावर नोंदणी रद्दची कारवाई केली जाणार आहे.

– श्रीकांत पवार, उपआयुक्त, विविध कर विभाग, महापालिका

हेही वाचा : 

Back to top button