महिला वारकर्‍यांना शिवीगाळ; महामार्ग अडवून निषेध | पुढारी

महिला वारकर्‍यांना शिवीगाळ; महामार्ग अडवून निषेध

साखरवाडी, पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील तांबमाळ, ता. फलटण येथील वखार महामंडळाच्या धान्य साठवण इमारतीच्या आवारात येथील सुरक्षा रक्षक व दोघा अज्ञातांनी दिंडीतील महिला वारकर्‍यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकाराचा निषेध नोंदवत पुणे येथील विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळाच्या दिंडीतील वारकर्‍यांनी ठिय्या मारुन महामार्ग बंद केला.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पाच दिवसांच्या मुक्कामी सातारा जिल्ह्यात आला आहे. लोणंद येथील दोन दिवसांचा मुक्काम उरकून हा सोहळा फलटण तालुक्यातील तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाला.

पालखी मार्गावरील तांबमाळ येथील वखार महामंडळाच्या धान्य साठवण इमारतीच्या आवारात सुरक्षा रक्षकाने हा मार्ग काटेरी झुडपे टाकून बंद केला होता. यावरुन वारकरी व सुरक्षा रक्षक विजय (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य दोघांबरोबर वादावादी झाली. यामुळे संतप्त वारकर्‍यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरच ठिय्या मांडून वाहतूक रोखली. स्थानिक नागरिक व पोलिसांनी संबंधित सुरक्षारक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकर्‍यांनी महामार्ग खुला केला.

Back to top button