![Elon Musk: एलन मस्क भारत दौऱ्यावर येणार; गुंतवणुकीबाबत उत्सुक](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेत पोहोचताच पंतप्रधान मोदी यांनी अनेक बड्या उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची भेट घेतली. यावेळी टेस्लाचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनीही मोदींची भेट घेऊन भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. मी मोदींचा चाहता आहे, त्यांनी मला भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले असून पुढील वर्षी भारतात येणार असल्याचे मस्क यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
एलन मस्क (Elon Musk) म्हणाले की, भारताच्या भविष्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदी यांना भारताची खूप काळजी आहे. ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. आम्ही ते करून दाखवू. फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहोत. भारतात तंत्रज्ञानामध्ये पंतप्रधान मोदी यांना चांगले काम करायचे आहे. त्यांना नवीन कंपन्यांमध्ये मोकळेपणा हवा आहे. सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात काम करण्याची भारताची मोठी क्षमता आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची चांगली क्षमता आहे.
मस्कने भारतात स्टारलिंक या त्यांच्या इंटरनेट कंपनीबद्दल सांगितले की, आम्ही स्टारलिंकला भारतात घेऊन जाण्याचा विचार करत आहोत, जे भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. जिथे इंटरनेट नाही किंवा इंटरनेटचा वेग खूपच कमी आहे, तिथे याचा मोठा फायदा होऊ शकतो.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी 2015 मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कॅलिफोर्नियातील टेस्ला मोटर्सच्या कारखान्याला भेट दिली होती. नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, अभ्यासक, उद्योगपती आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसह त्यांनी पहिल्याच दिवशी डझनभर मोठ्या व्यक्तींची भेट घेतली.
हेही वाचा