जावळीचा पहारेकरी महिमंडणगडचे संवर्धन | पुढारी

जावळीचा पहारेकरी महिमंडणगडचे संवर्धन

खेड शहर; पुढारी वृत्तसेवा :  रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर रघुवीर घाटावरील सह्याद्रीच्या अभेद्य भिंतींमधून जावळी खोर्‍याचे संरक्षण करणार्‍या महिमंडणगडावर सह्याद्री प्रतिष्ठान खेड विभागामार्फत दुर्गसंवर्धन कार्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात गडाची पाहणी करून दुर्गसंवर्धन कार्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गडावर वर्षभर विविध कामे केली जाणार आहेत.

सध्या गडावरील फक्त एकाच टाक्यात पिण्यायोग्य पाणी असून ते ही मे महिन्याअखेर दूषित होते. त्यामुळे गडावरील टाके स्वच्छतेला प्रथम प्राध्यान्य देण्यात आले. त्यानुसार वन विभागाच्या मार्गदर्शनाने गडावरील मातीने बुजलेली टाके स्वच्छ करण्यात आले. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचून टाक्यांचे स्रोत जिवंत होतील. गडावर इतर कुंड असून ते सद्यस्थितीत मातीने बुजलेले आहेत. ते पुढील काळात स्वच्छ केले जातील, असे खेड विभागप्रमुख अमोल भुवड यांनी सांगितले.

पाण्याचे टाके, घरांचे चौथरे, मंदिर, तटबंदी आणि बुरुज या दुर्ग अवशेषांचे संवर्धनाच्या दृष्टीने जी.आय.एस. मॅपिंग करण्यात आले. पायथ्यापासून गडावर जाणार्‍या पायवाटेवर दिशादर्शक फलक दाखविण्यात आले. गडावरील या संवर्धन कार्यास बाळकृष्ण हबणीस, सुरेश सूर्यवंशी , राजेंद्र ढबे, शैलेश तांबे आदी वनविभागाचे कर्मचारी आणि शिंदी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती खेड विभाग सदस्य महेश जाधव यांनी दिली. या संवर्धन श्रमदान मोहिमेत सुनील शेलार, जितेंद्र माने, ओमकार मोरे, साहिल भोसले, रोहन जाधव, आर्यन कावणकर, विल्सन रॉड्रीक्स आणि श्रेयस उतेकर आदी दुर्गसेवक उपस्थित होते.

महिमंडणगडाची समुद्र सपाटीपासून उंची 2790 फूट एवढी असून हा गड सहा एकरमध्ये पसरलेला आहे. गड बामणोलीच्या पश्चिमेला 17 किमी अंतरावर असून शिंदी हे गाव पायथ्याला आहे.

गडाचा इतिहास

प्रतापगडाच्या पूर्वेला 3 किमी व सरळ रेषेत माल्कमपेठच्या वायव्येला 5 किमी मध्ये जावळी आहे. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये जावळी भागावर अविधेय नामक राष्ट्रकुट राजाची राजवट असताना जावळा-वाटिका नामक वाडीचा उल्लेख अविधेयाच्या पांडरंगपल्ली ताम्रपट शासनात आला आहे. जावळा -वाटिका म्हणजेच जावळी असे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस जावळी आणि आसपासचा परिसर शिर्क्यांच्या आधिपत्याखाली होता. इ.स.1489-1510 मध्ये चंद्रराव मोरे ने विजापूरच्या युसुफ आदिलशाहाच्या मदतीने जावळी आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे तिथे आदिलशाही सत्ता स्थापन झाली. इ.स.1508-1553 मध्ये चंद्रराव मोरे यांनी विजापूरकरांच्या बाजूने पंढरपूर जवळील लढाई निजामशहा विरुद्ध जिंकली, तेव्हा विजापूरकडून त्यांना चंद्रराव ही पदवी मिळाली. इ.स.1649 मध्ये अफजलखानाची वाई प्रांत सुभेदार म्हणून नेमणूक झाली. काही काळातच विजापूर दरबाराने कर्नाटकची मोहीम खानावर सोपविली. त्यामुळे जावळी जमाव बसवू शकला नाही. डिसेंबर 1655 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर संभाजी कावजी बरोबर सिमिलकर बांदल व कान्होजी जेधे यांना सैन्य देऊन जावळीवर हल्ला करण्यास पाठविले. मोर्‍यांनी पहिला हल्ला मोडून काढला. त्यानंतर रघुनाथ बल्लाळ कोरडे यांनी मागाहून हल्ला चढविला. मोरे लढले पण या लढाईत हणमंतराव मोरे मारला गेला. प्रतापराव मोरे विजापुरात पळून गेला. 27 जानेवर 1656 मध्ये जावळी स्वराज्यात सामील झाली. याच धामधूमीत महिमंडणगडही स्वराज्यात सामील झाला. वासोटा किल्ल्यावरील घडामोडीत कोकणातून येणार्‍या मार्गावर महिमंडणगडाने महत्त्वाची भूमिका बजावली. पेशवेकाळापर्यंत हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी घेतला. गडपायथ्याशी एका अनामिक मोठ्या वीराची समाधी आहे. हा मोरे घराण्यातील पुरुष असावा, असे येथील ग्रामस्थ सांगतात. ही माहिती दुर्गसेवक वैभव सागवेकर यांनी दिली.

असे जाता येते गडावर…

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वन्य जीव वन परिक्षेत्र बामणोली यांच्या अंतर्गत हा गड येतो. या ठिकाणी गड पाहण्यापूर्वी वन चौकीला भेट देऊन आपली माहिती देणे आवश्यक आहे. वन्यजीव सहवास असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे ड्रोन कॅमेरा आणि स्पीकर वाजविण्यास सक्त मनाई असून त्याचे उल्लंघन झाल्यास वन विभागाकडून कठोर कारवाई होईल. तसेच सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता या वेळतच गड पाहता येतो याची पर्यटकांनी नोंद घ्यावी. गडावरून चकदेव (चक्रेश्वर मंदिर), पर्वत डोंगर ही ऐतिहासिक स्थळे तर सुमारगड, महिपतगड, मधुमकरंदगड, वासोटा हे किल्ले दिसतात.

Back to top button