Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार | पुढारी

Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात शुक्रवारी (दि. २८) दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार सलामी दिली. खमताणे येथे वीज पडून दोन गायी ठार झाल्या. याव्यतिरिक्तही ठिकठिकाणी पावसाने शेतीपिकांची मोठी हानी झाली.

तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर कायम आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळाली नाही, तोच पुन्हा ठिकठिकाणी अवकाळी पाऊस धुडगूस घालत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील मोसम, करंजाडी, आरम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सायंकाळी 5 नंतर अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. सद्यस्थितीत तालुक्यात उन्हाळ कांदा काढणी व कांदा चाळीत भरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून अचानक आलेल्या पावसामुळे मात्र ठिकठिकाणी कांदा भिजून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

खमताणे येथील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाघ यांच्या गावाशेजारील शेतात चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाडाखाली बांधलेल्या दोन गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. या दोन्ही गायी गाभण होत्या. त्यामुळे वाघ यांची हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button