कसा असावा ऑफिसमधील पेहराव? | पुढारी

कसा असावा ऑफिसमधील पेहराव?

नोकरदार महिलांमध्ये होणारे बदल केवळ बढती मिळून उच्चपदावर स्थानापन्न होण्यापर्यंतच मर्यादित राहिलेले नसून त्यांचा पेहराव देखील लक्षणीयरीत्या बदललेला दिसतो. नोकरदार महिलांच्या ऑफिस ड्रेसची निवड आता भारतीय पेहरावाव्यतिरिक्त बिझनेस सूट, शर्ट, स्कर्ट आणि ट्राऊझर यामध्ये बदललेली दिसते. जागतिक पातळीवर फॅशन प्रत्येक 10 वर्षांत बदलत असते. मात्र, भारतात हा ट्रेंड 20 वर्षांत दिसतो. भारतीय फॅशनच्या पद्धतीत आलेल्या बदलांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसुद्धा दिसत असते.

1940 ते 1950 हा स्वातंत्र्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा काळ होता. यामध्ये साधेपणावर जोर होता. त्यामुळे हाय कॉलर आणि नेट, लाँग टॉप, फुलस्लिव्ह साडी-ब्लाऊज, यासारख्या पेहरावाची चलती होती. साठ ते सत्तर या दशकात मूलभूत सामाजिक बदलांसोबत कपडे मुलायम झाले आणि बाह्या थोड्या कमी लांबीच्या होऊ लागल्या. सलवार सूट थोडे घट्ट आणि स्कर्टची लांबी कमी झाली. यामुळे लूक थोडा आधुनिक बनला. 80 ते 90 च्या दशकात महिला आणि पुरुषांच्या पेहरावामधील अंतर कमी होऊ लागले. हातापासून बनवलेल्या कपड्यांच्या जागी रेडिमेडचा जमाना आला.

2000 पासून आतापर्यंत आर्थिक स्वातंत्र्य आणि फॅशनेबल वस्तूंच्या सुलभतेमुळे फॅशन क्षेत्रात नाट्यमयरीत्या बदल घडून आले. मल्टिबटन जॅकेट, शॉर्ट स्कर्ट इतकेच नाही तर सलवार आणि साडी हे पेहरावही आधुनिक बनले. कपडे छोटे आणि पारदर्शी होत गेले. ऑफिस वूमेन्सची संख्या वाढली. परिणामी, कॉर्पोरेट जगतात वावरताना लूक अतिशय महत्त्वाचा ठरू लागला. त्यामुळेच आज फॅशनच्या या प्रवाहात वाहत जाऊन ऑफिसमधील अलिखित नियम न मोडता, आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी काही गोष्टी आवश्य पाळाव्यात. ऑफिससाठी कपड्यांची किंवा अ‍ॅक्सेसरीजची निवड करताना ते आरामदायी आणि नीटनेटके असावेत. फिरताना अथवा वेगवेगळ्या हालचाली करताना अडचण येता कामा नये.

संबंधित बातम्या

आपल्या कामामध्ये जास्त पळापळी असेल तर त्यानुसार ड्रेसची निवड करावी. काही व्यवसायांसाठी ड्रेसबाबत मार्गदर्शक नियम असतात. त्यांचे पालन केले गेले पाहिजे. कामाच्या ठिकाणी असे कपडे घालावेत, ज्यामुळे आपली मानसिक स्थिती शांत राहील. काहीवेळा वेगळ्या प्रकारचे कपडे घातल्यामुळे ऑफिसातील प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे वेगळ्या द़ृष्टीने पाहू लागते. त्यामुळे त्रास होऊ शकतो. काम करताना अवघडल्यासारखे वाटू लागते. काही कंपन्यांमध्ये स्टँडर्ड युनिफॉर्म असतो. मात्र, हा युनिफॉर्म स्वच्छ, इस्त्री केलेला आणि नवा दिसणारा असावा. घातलेल्या पेहरावामधून आपली क्षमता आणि अधिकार दिसला पाहिजे. ऑफिस म्हणजे फॅशन किंवा स्टाईल दाखवण्याचे ठिकाण नाही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आधुनिक भारतीय कार्यालयीन पेहराव निवडताना आपल्याला घर आणि ऑफिसच्या ड्रेसमध्ये स्पष्ट अंतर ठेवावे लागेल.

ऑफिसमध्ये जाताना कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज अशाप्रकारे निवडाव्यात, जेणेकरून आपण कुठून आलो आहोत याचा विसर पडेल. आपला पेहराव हा आपली ओळख बनवत असतो. त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्त्वानुसारच पेहराव निवडावा. ग्लोबल ट्रेंड कुठलाही असो तो डोळे बंद करून स्वीकारू नये. आपल्या कामाच्या स्वरूपाशी मेळ घालणार्‍या फॅशनचीच निवड करावी. ड्रेसची निवड करताना पुरुषांपेक्षा जास्त सक्षम आणि तेजस्वी दिसण्याचा प्रयत्न करण्यात संकोच बाळगू नये. ऑफिसमध्ये आपले व्यक्तिमत्त्व हे प्रभावी ठरण्यासाठी घातलेला पेहराव आणि आपण वापरत असलेल्या अ‍ॅक्सेसरीज खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे त्यांची निवड काळानुसार, आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार आणि ऑफिसच्या वातावरणानुसार करावी.

– विधिषा देशपांडे

Back to top button