

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून, देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला नवीन दिशा देऊन आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. लोणावळा येथील दि म्बी व्हॅली सिटी येथे समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कैलास पगारे, कौस्तुभ दिवेगावकर, कृष्णकुमार पाटील, शरद गोसावी, महेश पालकर आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, देशाची पुढची पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षण विभागाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत एकत्र विचारमंथन करावे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, अंगणवाडी सेविकांना नर्सरीबाबत शिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला, गायन, नाट्य आदी कलाविषयक शिक्षण, विद्यार्थ्यांचा मानसिक अभ्यास, नावीन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, उपाययोजना, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यांसारख्या विविध बाबीवर वैचारिक देवाण-घेवाणही या कार्यशाळेत करावी.
आपल्या सूचनांचा शासनस्तरावर विचार करून शिक्षण विभागाची पुढची दिशा ठरवली जाईल. देओल म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करणे, क्षेत्रीय स्तरावर होणार्या कामाबद्दल या कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. मांढरे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सर्वंकष शिक्षणाला विभागाने प्राधान्य दिलेले आहे.