Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून | पुढारी

Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

अब्जाधिशच नव्हे तर सरपंच, शेतकरी पुत्रांनीही हेलिकॉप्टरमधून मांडव गाठल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, मालेगावात सोमवारी (दि.24) एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. त्यात मित्राचे स्वप्न साकार करण्यासाठी दुसर्‍या मित्राने नववधू आणि वराचे आगमन आणि पाठवणी थेट हेलिकॉप्टरने घडवली.

चंदनपुरी येथील आदिवासी कुटुंबातील कैलास पवार यांची मुलगी पूर्वा हिचा लखमापूर येथील भुरा सोनवणे यांचे चिरंजिव लोकेश याच्याशी विवाह निश्‍चित झाला. काही वर्षांपूर्वी पवार यांनी मित्र, बाराबलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडुकाका बच्छाव यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती. बच्छाव यांची मुलगी प्राजक्ता हिचा 2020 मध्ये धुमधडाक्यात विवाह झाला होता. तेव्हा पवार यांनी, आमदार, खासदार, उद्योगपती, बागायतदार यांचे जावई हेलिकॉप्टरने येतात, तसाच माझाही जावई यावा, असे स्वप्न असल्याचे बोलून दाखवले होते.

त्याची आठवण ठेवत बच्छाव यांनी आदिवासी मित्राला दिलेला शब्द सोमवारी खरा करुन दाखवला. नांदुरी येथून वधू-वर हेलिकॉप्टरने शहरातील कॉलेज ग्राउंडवर उतरले आणि आदिवासी समाजाने एकच जल्लोष केला. पॉम नर्सरीत हा विवाह सोहळा होऊन पुन्हा त्याच हेलिकॉप्टरने मुलीची पाठवणीही झाली. या सोहळ्याची एकच चर्चा होत आहे.

हेही वाचा :

Back to top button