पुणे : दांगट यांच्यावर लवकरच कारवाई : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांची माहिती | पुढारी

पुणे : दांगट यांच्यावर लवकरच कारवाई : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे विकास दांगट यांना पुढे करून भाजप बाजार समितीत शिरकाव करू पाहत आहे. दांगट यांना खडकवासला विधानसभेचे गाजर दाखविल्याची चर्चा असून भाजपचा हा छुपा अजेंडा आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल पुढील दोन दिवसांत विकास दांगट यांच्यावरील कारवाईवर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलची भूमिका सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गारटकर बोलत होते. या वेळी आमदार सुनील टिंगरे, दिलीप बराटे, प्रकाश म्हस्के यांच्यासह राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, र्त्यंबक मोकाशी, भरत झांबरे आदी उपस्थित होते.

गारटकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीमधील काही नेत्यांना गाजरे दाखवून पुणे बाजार समितीवर शिरकाव करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यामध्ये केवळ राष्ट्रवादीचे नाव वापरून आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी ही सर्वपक्षीय असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. विकास दांगट यांच्याकडून मिळणारी वागणूक कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी होती. दांगट यांच्याशी निवडणुकीतील पॅनेल करण्यासाठी अनेक वेळा चर्चा केली असता त्यांनी वेळकाढूपणा करत शेवटच्या टप्प्यापर्यंत गाफील ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप गारटकर यांनी केला.

हवेली तालुक्यात बहुतांशी विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. भाजप छुप्या पध्दतीने या निवडणुकीत उतरला असून, पक्षाच्या नावावर मते मागितल्यास ती मिळणार नसल्याने ते निवडणुकीत उघड आले नाहीत. ज्यांच्यामुळे गेली 19 वर्षे पुणे बाजार समितीची निवडणूक होऊ शकली नाही, अशा भ्रष्टाचारी संचालकांना सर्वपक्षीय पॅनेलमध्ये उतरविल्याने भाजपचे प्रयत्न लक्षात आले आहेत. भाजपच्या विकास आघाडीला हवेली तालुक्यातील सूज्ञ मतदार जागा दाखवतील, असा इशाराही गारटकर यांनी दिला.

Back to top button